हेमंत शेडगे मोहोळ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी
मोहोळ(कटूसत्य वृत्त):- संवेदनशील आणि अवैध धंद्याबरोबर वारेमाप वाळू उपसा या गोष्टीमुळे सातत्याने प्रशासन स्तरावर वादग्रस्त ठरलेल्या मोहोळ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दि. २४ डिसेंबर रोजी रात्री काढले. रात्री दहा नंतर शेडगे यांनी पदभार स्वीकारून बुधवारपासून कामाला प्रारंभ देखील केला आहे.
यापूर्वीचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत हे पदोन्नतीने लातूर ग्रामीण पोलीस दलात बदलून गेले आहेत. त्यानंतर मोहोळ येथे प्रशासकीय कार्यवाहीने पोलीस निरीक्षक नियुक्त करण्यापूर्वी तात्पुरत्या स्वरूपाचा पदभार अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतमकुमार यावलकर यांनी पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्याकडे काही दिवसांसाठी दिला होता. पोलीस निरीक्षक रणजीत माने आणि त्यांच्या टीमने यल्लमवाडी येथील निर्घृण खुनाचा तपास केवळ बहात्तर तासांच्या आत लावून जिल्हा पोलीस प्रशासनाकडून शाबासकीची थाप मिळवली होती. त्यानंतर वरिष्ठ प्रशासकीय स्तरावर घडामोडी घडून जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाकडून मोहोळच्या पोलीस निरीक्षकपदी हेमंत शेडगे यांचे नाव निश्चित करण्यात आले.
मोहोळ पोलीस ठाण्यासाठी पोलीस निरीक्षक संजय जगताप आणि हेमंत शेडगे यांच्या नावाची चर्चा गेल्या आठवड्यापासून सुरू होती. मात्र, या चर्चेला शेडगे यांच्या अधिकृत नियुक्तीच्या आदेशाने पूर्णविराम मिळाला. मंगळवारी रात्री दहा नंतर प्रभारी पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्याकडून नूतन पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी मोहोळच्या निरीक्षक पदाचा पदभार स्वीकारला.
हेमंत शेडगे यांनी यापूर्वी पुणे ग्रामीण पोलीस दलात सेवा बजावली असून त्यांनी शिरूर, शिक्रापूर, यवत, दौंड येथे सेवा बजावून पोलीस दलाची प्रतिमा उंचावण्याचे कर्तव्य पार पाडले आहेत. याशिवाय त्यांनी सुदान येथे जाऊन पोलीस दलातील विशेष प्रशिक्षण कालावधी देखील पूर्ण केला असल्यामुळे परदेशात प्रशिक्षण घेऊन मोहोळला सेवा बजावणारे प्रथम पोलीस निरीक्षक होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे.
0 Comments