अगोदर सरकार होऊ द्या,मग उपोषणाची तारीख ठरवू
सोलापूर(कटूसत्य वृत्त):- अगोदर राज्यात सरकार स्थापन होऊ द्या, त्यानंतरच आपण आरक्षणप्रश्नी करण्यात येणाऱ्या उपोषणाची तारीख जाहीर करू सरकार स्थापन होण्यापूर्वीच आम्ही उपोषणाची तारीख जाहीर केली तर राज्यात सरकार स्थापन करण्याऐवजी राष्ट्रपती राजवट लागू करतील आणि आमची गोची करतील, अशी भीती मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी व्यक्त केली. जरांगे - पाटील हे रविवारी तुळजापूर येथील देवीचे दर्शन घेऊन पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघाले असता त्यांचे सोलापुरात जुना पुणे नाका येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याजवळ सकल मराठा समाजाच्यावतीने समन्वयक माउली पवार यांनी स्वागत केले. यावेळी राजन जाधव, प्रा. गणेश देशमुख, शिवाजीराव चापले, सचिन तिकटे, संदीप काशीद, अरविंद गवळी, दादा गांगर्डे, विष्णू जगताप उपस्थित होते. तत्पूर्वी जरांगे-पाटील यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जरांगे - पाटील म्हणाले, सरकार कोणाचेही आले तरी आम्ही आरक्षण घेणारच. त्यासाठी आता अंतरवाली सराटीत सामुदायिक आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. याची तारीख नंतर जाहीर करणार आहोत. अंतरवाली सराटी येथे करण्यात येणाऱ्या सामुदायिक उपोषणासाठी राज्यभरातील मराठा बांधव एकत्र येणार आहेत.मुंबईत उपोषण करण्याचा समाजाचा आग्रह आहे. त्यामुळे पुढील उपोषण कदाचित मुंबई येथेही होईल. आता आरक्षणाची ही चळवळ थांबवणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात मराठा समाजाशिवाय कोणाचीही सत्ता स्थापन होऊ शकत नाही. यावेळी मराठा समाजाने मराठा आमदारांबरोबरच मोठ्या संख्येने ओबीसी आमदारही निवडून आणले आहेत. त्यामुळे या सर्वांनीच आता आरक्षणाचा विषय मार्गी लावावा, अन्यथा समाज त्यांना घराबाहेर फिरु देणार नसल्याचा इशाराही जरांगे - पाटील यांनी दिला. दरम्यान, जरांगे - पाटील यांचे तुळजापूरहून येत असताना महामार्गावरील विविध गावांत उत्साहात स्वागत करण्यात आले. सोलापुरातील स्वागत स्वीकारून ते पंढरपूरसाठी रवाना झाले.
0 Comments