Hot Posts

6/recent/ticker-posts

बाजार समिती निवडणुकीच्या हालचालींना वेग

 बाजार समिती निवडणुकीच्या हालचालींना वेग




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्थगितीला ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत दिलेली मुदत संपत आली आहे. त्यामुळे निवडणूकीचा पुढील प्रारूप कार्यक्रम तयार करुन लवकरच
सहकार निवडणूक प्राधिकरणाला पाठविण्यात येणार आहे. प्राधिकरणाने मंजूरी दिल्यानंतर
बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरु होणार आहे. दुसरीकडे राजकीय हालचालींनाही प्रचंड वेग आला आहे.बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात 'भाजपा'चे आ.विजयकुमार देशमुख, आ.सुभाष देशमुख,
आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. देवेंद्र कोठे हे चार आमदार आहेत. त्यामुळे भाजपाने ही
निवडणूक आता स्वबळावर लढण्याची तयारी सुरु केली आहे. काँग्रेस नेत्यांनीही ही निवडणूक मनावर घेतली आहे. काँग्रेसकडून सुरेश हसापुरे किंग ठरणार असले तरी माजी आ. दिलीप माने हे किंगमेकर ठरणार आहेत. माजी आमदार दिलीप माने यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.सोलापूर कृष उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत जवळपास ५ हजार ४७० मतदारांची नोंदणी झालेली आहे. तर
यामध्ये सर्वाधिक मतदार १२७६ हे व्यापारी मतदारसंघात आहेत तर त्या पाठोपाठ हमाल तोलार मतदारसंघात १ हजार ८५ आहेत. त्यानंतर विकास कार्यकारी सोसायटी मतदारसंघात दक्षिण सोलापूर तालुक्यात १ हजार ३९ मतदार आहेत. तर उत्तर सोलापूर तालुक्यात ६६३ मतदार आहेत.
ग्रामपंचायत मतदारसंघात दक्षिण तालुक्यात ८४४ तर उत्तर सोलापूरमध्ये ३७० मतदार
आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत मतदारसंघातील ४ जागेवर भाजपा जादू करेल अशी परिस्थिती
असली तरी विकास कार्यकारी सोसायटी मतदारसंघातील ११ जागेवर मात्र सुरेश
हसापुरे आणि माजी आमदार दिलीप माने यांचाच वरचष्मा राहणार असल्याचे सांगण्यात
येते. हमाल तोलार, व्यापारी मतदारसंघातही भाजपा कमाल करण्याची शक्यता असली
तरी विकास सोसायटी मतदारसंघात मात्र त्यांना हसापुरे आणि माने यांच्यावरच आवलंबून
रहावे लागणार आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या पॅनलमध्ये कोण असणार? भाजपा बरोबर कोण जाणार? यावर या निवडणूकीची भवितव्य अवलंबून आहे. काँग्रेस नेत्यांनी माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे, खा. प्रणिती शिंदे व इतर ज्येष्ठ मंडळींना सोबत घेवून पॅनल करण्याची तयारी सुरु केली आहे. भाजपाही या
निवडणूकीसाठी व्युहरचना तयार करण्याच्या कामी लागले आहेत.


चौकट 1
सहकार निवडणूक प्राधिकरण ठरवणार निवडणूक कार्यक्रम
यापूर्वी सुरु झालेल्या निवडणूक कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी स्थगिती देण्यात आली
होती. त्यामुळे या निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यावर ३१ डिसेंबर नंतर पुन्हा
या निवडणूकीचा कार्यक्रम सुरु होणार आहे. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा
जिल्हा उपनिबंधक यांनी वरिष्ठांना याबाबत विचार केल्याची चर्चा आहे. पुढील कार्यक्रम
ठरवून लवकरच त्याची घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

चौकट 2
तीच मतदारयादी अंतिम राहणार
 यापूर्वी १ जुलै २०२४ ही अहर्ता
दिनांक लक्षात घेवून निवडणूक
अधिकाऱ्यांनी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार
समितीसाठी ५ हजार ४७० मतदारांची
यादी जाहीर केली होती. त्यापैकी अनेक
मतदार अपात्र अथवा मयत असण्याची
शक्यता आहे. त्यामुळे मतदारयादी पुन्हा
करण्याची मागणी काही लोकांनी केली
होती. मात्र निवडणूक कार्यक्रम जरी
जाहिर झाला तरी मतदारयादी तीच
अंतिम राहणार असल्याचा निर्वाळा
निवडणूक कार्यालयाच्या वतीने देण्यात
आला आहे.



Reactions

Post a Comment

0 Comments