'वन नेशन, वन इलेक्शन' विधेयकाच्या बाजूने 269 तर विरोधात 198 मते, सरकारला बहुमताचा आकडाही गाठता आला नाही
नवी दिल्ली (वृत्त सेवा):- 'वन नेशन – वन इलेक्शन' विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी आज मतदान झाले. तेव्हा मोदी सरकारला बहुमतासाठीचा 272चा आकडाही गाठता आला नाही हे स्पष्ट झाले. विधेयक मांडण्याच्या बाजूने 269 तर विरोधात 198 मते मिळाली.
या वेळी विरोधकांनी हे विधेयक म्हणजे संविधानाच्या मूलभूत रचनेवर हल्ला आहे. त्यामुळे विधेयक मागे घ्यावे, अशी जोरदार मागणी केली. दरम्यान, विधेयक मंजूर होण्यासाठी दोन तृतीयांश बहुमत आवश्यक आहे.
पेंद्रीय विधी व न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी 'एक देश – एक निवडणूक' यासाठी 129वी घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत मांडले. या वेळी विरोधी पक्षांनी भूमिका मांडताना विधेयकाला जोरदार विरोध केला. काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, द्रमूक, माकप, भाकप, आपसह 15 पक्षांनी विरोध केला.
विधेयक जेपीसीकडे
गृहमंत्री अमित शहा म्हणाले, जेव्हा 'वन नेशन – वन इलेक्शन' हे विधेयक मंत्रिमंडळात आले होते तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे (जेपीसी) पाठवावे, असे म्हटले होते. यावर आता कायदा मंत्री प्रस्ताव देऊ शकतात. दरम्यान, हे विधेयक लवकरच जेपीसीकडे पाठवले जाणार आहे. त्यासाठी समिती गठीत केली जाईल.
भाजपच्या 20 खासदारांना नोटीस
'एक देश – एक निवडणूक' विधेयक सादर होणार आहे. त्यासाठी लोकसभेतील सर्व सदस्यांनी हजर राहावे, असा तीन ओळीचा व्हिप भाजपने आपल्या खासदारांना बजावला होता. मात्र आज चक्क 20 भाजप खासदारांनी हा व्हिप झुगारून लावला. 20 खासदारांनी दांडी मारली. त्यामुळे मतदानावेळी पक्षाची नाचक्की झाली. दोन तृतीयांश तर नाहीच, साधा बहुमताचा 272चा आकडाही गाठता आला नाही. त्यामुळे भाजपने 20 खासदारांना नोटीस बजावली आहे.
बॅलेट पेपरवर मतदान
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान करण्याचे जाहीर केले. यामध्ये 379 सदस्यांनी मतदान केले. विधेयकाच्या बाजूने 220 आणि विरोधात 149 मते पडली. या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रक्रियेला विरोधी पक्षाच्या खासदारांनी आक्षेप घेतला. त्यावर ज्यांचा आक्षेप आहे त्यांना स्लिप द्या, असे अध्यक्षांनी सांगितले. त्यानंतर स्लिपद्वारे मतदान झाले तेव्हा मतसंख्या बदलली. विधेयकाच्या बाजूने 269 तर विरोधान 198 मते पडली.
0 Comments