Hot Posts

6/recent/ticker-posts

विकासाची घडी विस्कटवून सुजाण मतदारांना काय मिळणार ?

 विकासाची घडी विस्कटवून सुजाण मतदारांना काय मिळणार ?






मोहोळ (कटूसत्य वृत्त):- गेल्या दहा दिवसापासून मोहोळ विधानसभेच्या निवडणुकीत अत्यंत खालच्या पातळीचे आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. या निवडणुकीत सर्वात महत्त्वाचा असणारा विकासाचा मुद्दा हेतूपूर्वक
दुर्लक्षित केला जात आहे. सभेमधली गर्दी मतदानामध्ये परावर्तित होण्यासाठी काही अवधी लागत असतो. कारण काही लोक हे निवडणुकीतील आरोप प्रत्यारोप एन्जॉय करण्यासाठी देखील येत असतात. आणि लोकशाही मधील पवित्र कर्तव्य असलेलं मतदान हे ऐनवेळी ठरत नसतं तर पाच वर्षाच्या केलेल्या कामाचे मूल्यमापन हे प्रत्येक मतदाराच्या मनामध्ये अगदी ठाम आणि घट्टपणे असतं. त्यामुळे नेहमीच निवडणुकीत जात धर्म अशा बाबी याशिवाय अँटी इन्कम्बन्सीला महत्त्व नसतं हे मात्र तितकच खरं. मोहोळ मतदारसंघ आरक्षित झाल्यापासून राजन पाटील यांनी पक्षाने दिलेला उमेदवार विजयी तर केलाच मात्र सत्ता असो अथवा नसो मतदारसंघाची विकासाची घडी देखील शाबूत ठेवली. वास्तविक पाहता आरोप हे उमेदवारांवर होत असतात आणि ते व्हावे देखील कारण निवडणुकीचा केंद्रबिंदू हा उमेदवारच असतो. मात्र मोहोळ तालुक्यात केवळ राजन पाटील यांना जाणीवपूर्वक टार्गेट करून निवडणुकीतील मुद्दे भरकटवण्याचं काम विरोधी पक्षाकडून होत आहे. राजन पाटील यांनी मतदारसंघ आरक्षित होऊनही कधी जात केंद्रित आणि धर्मकेंद्रीत राजकारणाला वाव दिला नाही. मोहोळ शहरातील अनेक समाज बांधवांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महत्त्वाच्या पदावर संधी दिली ती केवळ राजन पाटील यांनीच. आज विरोधकांच्या व्यासपीठावरून आरोप करणारे 90% नेते हे राजन पाटील यांनी दिलेल्या संधीमुळेच पुढारपण करत आहेत हे संपूर्ण तालुक्याने पाहिले आहे. शिवाय विविध सहकारी संस्थांमध्ये त्यांनी सर्व समाजबांधवांना समान संधीने नोकरीची संधी दिली. मोहोळ शहरातील अनेक युवकांच्या काम देण्याबरोबर हाताला समाजकारणातील अनेक चांगल्या व्यक्तींना राजकीय क्षेत्राची आवड
निर्माण करून त्यांच्याकडून चांगल्या दर्जाची विकास कामे आणि लोकहिताची कार्ये करून घेण्यामध्ये त्यांनी मोठे कार्य केले आहे हे कोणीही नाकारणार नाही. राजन पाटील यांच्या चाणक्य आणि प्रगल्भ विचारसरणीच्या नेतृत्वाने कोथिंबीरची जुडी देखील पारखून घेण्याचे काम आजपर्यंत केले आहे त्यामुळे उमेदवाराची निवड करताना त्यांच्या हातून चूक होणे कधीही शक्य नसते. त्यांनी स्थानिकांचा विरोध असूनही लक्ष्मण ढोबळे यांना
मोठ्या मनाने संधी देत मोहोळ तालुक्यातून पालकमंत्री पदापर्यंत जाण्यासाठी सहकार्य केले. 14 दिवसात रमेश कदम यांना आमदार देखील राजन पाटील यांनीच केले. याशिवाय यशवंत माने यांना देखील पहिल्याच
प्रयत्नात आमदारकी मिळवून देण्यामध्ये राजन पाटीलच किंगमेकर ठरले हे सर्वांनी पाहिले आहे. आमदार यशवंत माने यांनी पाच वर्षाच्या कालावधीत एक दिवसही उसंत न घेता सातत्याने मुंबई दरबारी हेलपाटे घालत साडेतीन हजार कोटी रुपयांचा निधी खेचून आणला. विशेष म्हणजे विरोधक ज्या डांबरी रस्त्यावरून आलिशान गाड्या उडवत फिरत आहेत ते रस्ते याच तात्यांच्या कालावधीत झालेले बहुतेक ते विसरले असतील पण जनता विसरत नाही. चार दोन मुद्द्यांना पुढे करत त्यांच्या संपूर्ण राजकारणाला दोष देण्याचे काम विरोधकांकडून अत्यंत केविलवाण्या पद्धतीने होत आहे.
वास्तविक पाहता मोहोळ तालुक्यातील मतदार हा चाणाक्ष आणि सुजाण आहे. कित्येक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये त्यांना विरोध करणाऱ्या अनेक बालेकिल्ल्यांमध्ये त्यांनी त्यांचे उमेदवार सदस्यपदी निवडून आणले आहेत. त्यामुळे मोहोळ तालुक्यातील मतदान हे एक गठ्ठा कोणत्या पक्षाच्या बाजूने अथवा कोणत्या जाती समूहाच्या बाजूने असते असे म्हणणे उचित ठरणार नाही. ही निवडणूक देखील विकासाच्या मुद्द्यावरच गाजत आहे आणि विकासाच्या मुद्दयावरच केंद्रित होऊन मतदार त्यांच्या उमेदवाराला नक्की पुनश्च आमदारकीची संधी देतील यात तिळमात्र शंका नाही.

Reactions

Post a Comment

0 Comments