Hot Posts

6/recent/ticker-posts

विधानसभा निवडणुकीत बार्शीत मतदानाचा टक्का घसरल्याने याचा फटका महायुतीचे राजेंद्र राऊत यांना बसला

 विधानसभा निवडणुकीत बार्शीत मतदानाचा टक्का घसरल्याने याचा फटका महायुतीचे राजेंद्र राऊत यांना बसला




बार्शी (कटूसत्य वृत्त):-  बार्शी विधानसभा निवडणुकीत शहरातील मतदानाचा टक्का घसरल्याने याचा फटका महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना बसला. विकासकामे करूनही हा टक्का का घसरला, याचे चिंतन आता राऊत गटाकडून सुरु आहे. बार्शी विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार राऊत यांचा ६ हजार ४७२ मतांनी पराभव झाला. या पराभवात बार्शी शहरासह ग्रामीण भागातही त्यांना अपेक्षित मते मिळाली नाहीत.शहरातील जिजामाता मंदिर प्रशाला तसेच महात्मा फुले विद्यामंदिर याचबरोबर सुभाष नगर परिसरातील ममता हायस्कूल आदी ठिकाणी असलेल्या मतदान केंद्रांवर राऊत यांच्या मतांची टक्केवारी कमी झाल्याचे समोर आले आहे. बाजारपेठेत असणाऱ्या मतदान केंद्रांमध्येही महायुतीचे उमेदवार राऊत यांना अपेक्षित मते मिळाली नसल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.
बार्शीत रस्ते तसेच शिवसृष्टी याचबरोबर शहीद स्मारक आदी विकासाची कामे होऊनही शहरातून मतांचा घटलेला टक्का याचा फटका राऊत यांना बसला आहे. वास्तविक महायुतीचे उमेदवार राऊत यांना शहराबरोबरच वैराग शहर व ग्रामीण भागात काहीअंशी कमी मते मिळाली. विधानसभा निवडणुकीतील पराभवाची कारणे शोधत असताना एवढ्याच बाबी नसून गटांतर्गत असणारी स्पर्धा याचीही किंमत राऊत यांना मोजावी लागली आहे. यानंतरही या निवडणुकीत टपाली मतांमुळेही फरक पडल्याचे दिसले. यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अॅड. दिलीप सोपल यांना १९९३ तर महायुतीचे राऊत यांना १२४९ मते पडल्याने इथेही मतांची घट झाली. यानंतरही शहर व तालुक्यातून एकूण १ लाख १६ हजार २२२ मते राऊत यांच्या पारड्यात पडली. पराभवानंतरही विकासकामात कोणताही खंड असणार नसून ते सुरु राहतील, असे पराभवानंतर राऊत यांनी सांगितले. दरम्यान, शहरातून अपेक्षित मतदान केंद्रांवर घटलेला मतांचा टक्का व ग्रामीण भागात खात्रीच्या ठिकाणीही बसलेला फटका याचे चिंतन आता राऊत गटाकडून सुरु आहे. आमदारकी हातून गेली असली तरी राज्यात महायुतीचेच सरकार आल्याने तेवढी एक जमेची बाजू राऊत यांच्यासाठी असणार आहे. यानंतरही पराभवाचे चिंतन आता महायुतीचे उमेदवार राऊत व त्यांच्या गटाकडून सुरु आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments