तिरंगी लढतीत शिंदे- मोहिते पाटलांची प्रतिष्ठा पणाला
माढा (कटूसत्य वृत्त):- माढा विधानसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडी व प्रचाराला मोठा वेग आला आहे. दिग्गज नेत्यांच्या सभा व आरोपांच्या फैरी सुरू आहेत. प्रमुख नेत्यांना आपल्या गटात खेचण्याची राजकीय स्पर्धाच लागली आहे.
अपक्ष उमेदवार रणजित शिंदे यांच्या प्रचारात त्यांचे वडील आमदार बबनराव शिंदे व प्रा. शिवाजीराव सावंत हेच स्टार प्रचारक म्हणून सक्रिय आहेत. आमदार शिंदे यांनी मागील तीस वर्षांत केलेल्या सिंचन, वीज, रस्ते, ऊस, शिक्षण, आरोग्य शिबिरे यासह इतर विकासकामांचा लेखाजोखा मांडत आहेत.
रणजित शिंदे यांनी निमगावच्या सरपंचपदापासून पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष म्हणून केलेल्या कामाचाही लेखाजोखा मांडत प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचार करत आहेत.
शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत, माजी समाजकल्याण सभापती शिवाजी कांबळे हे रणजित शिंदे यांच्या प्रचारात सक्रिय झाल्याने याचा रणजित शिंदे यांना फायदा होणार आहे.
विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तिकीट मिळविण्यात यशस्वी झाले आहेत.
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते -पाटील व खासदार धैर्यशील मोहिते -पाटील, टेंभुर्णीचे संजय कोकाटे हे त्यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. अरणच्या भारत शिंदे यांना आपल्या गोटात खेचण्यात अभिजीत पाटील यांना यश आले आहे. पाटील यांच्या प्रचारासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपळाई बुद्रुकमध्ये तर खासदार अमोल कोल्हे यांनी करकंबमध्ये प्रचारसभा घेतली आहे. आमदार शिंदे यांनी तीस वर्षांत अपेक्षित विकासकामे केली नसल्याचा आरोप पाटील हे प्रचारादरम्यान करत आहेत.
विठ्ठल कारखान्याच्या माध्यमातून जाहीर केलेला ऊस दर व मतदारसंघाच्या विकासासाठी करावयाची कामे याबाबतचे मुद्दे घेत प्रचार करीत आहेत.महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार माढ्याच्या नगराध्यक्षा मीनल साठे यांच्यारुपाने पहिल्यांदाच माढा विधानसभा मतदारसंघात संघात महिलेला संधी मिळाली आहे.
त्यांच्या प्रचारासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी टेंभुर्णीत प्रचारसभा घेतली.साठे घराण्याचा राजकीय वारसा, माढा नगरपंचायतीच्या माध्यमातून निर्माण केलेला माढ्याचा विकास पॅटर्न संपूर्ण मतदारसंघात नेण्याचा मानस आहे. आमदार शिंदे यांनी तीस वर्षात केलेल्या विकासाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. कल्याण काळे, संत कुर्मदास कारखान्याचे संचालक दादासाहेब साठे, कनिष्का साठे त्यांच्या प्रचारात आहेत. त्यांच्या काही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी ऐन कसोटीच्या काळात त्यांची साथ सोडली असली तरी भारतीय जनता पक्षाचे व महायुतीचे पदाधिकारी त्यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत.
0 Comments