Hot Posts

6/recent/ticker-posts

२०१९ ला उमेदवारीच्या शिफारशीसाठी उमेश पाटलांनी माझ्याकडे पैसे मागितले

 २०१९ ला उमेदवारीच्या शिफारशीसाठी उमेश पाटलांनी माझ्याकडे पैसे मागितले 

पेनुर येथील सांगता सभेत यशवंत माने यांचा गौफ्यस्फोट

पेनुर (कटूसत्य वृत्त):- विकास कामे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. येणाऱ्या काळात मोठ मोठे प्रोजेक्ट तालुक्याच्या विकासासाठी आणायची आहेत. येत्या पंचवार्षिक ला ५ हजार कोटींचा निधी मतदार संघात आणायचा उद्देश आहे. विजेचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून सोलरवर वीज निर्मिती करून जनतेला देऊ. समोरची टीम ही दलाल व भ्रष्टाचारी आहे. अशा टोळीचा प्रमुख वयाच्या ८४ काका साठे झाले असून ही केलेली चूक मिटविण्यासाठी पवार साहेबांच्या पायावर बारामती येथे जाऊन टोपी ठेवली आणि उमेदवारी बदलली. २०१९ ची उमेदवारी मिळवताना उमेश पाटील यांनी आम्ही कोर कमिटी मध्ये आहोत. आम्हा ३-४ जणांना पैसे द्यावे लागतील, तरच आम्ही राजन पाटील यांच्याकडे तुमची शिफारस करू असा गौफ्यस्फोट राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार यशवंत माने यांनी केला. 

 पेनुर (ता. मोहोळ) येथील सांगता सभेत ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, अजित दादांनी जो शब्द उमेश पाटलांबद्दल वापरले आहेत त्याच्यापेक्षाही पुढची अवस्था करायची आहे. डोंगरेंनी लोकशक्ती शुगरच्या निर्मितीसाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गहाण ठेवल्या आणि त्या लोकांचं वाटोळं केले. यामुळे अनेक लोकांनी आत्महत्या केल्या. यांच्यावर ३०२ सारखे गुन्हे दाखल होणे अपेक्षित आहे असे बोलून संघर्ष समितीच्या सर्व सदस्यांचा त्यांनी लुटणारी टोळी म्हणून खरपूस समाचार घेतला. 

 यावेळी बोलताना माजी आमदार राजन पाटील म्हणाले की, विरोधकांना ज्या भाषेत पाहिजे त्या भाषेत सर्व मान्यवरांनी उत्तरे दिलेली आहेत. पण मी या सर्वांना सांगेन अशा लोकांना फारसं महत्त्व द्यायचं नसतं. समाजसेवा न करता लोकांची प्रश्न न सोडवता फोकस मध्ये येण्यासाठी अशी टीकाटिपणी केली जाते, पण हा त्यांचा धंदा आहे तो त्यांना करू द्या. साधूने साधूचा धर्म पाळावा, विंचुने विंचवाचा धर्म पाळावा असा निसर्गाचा नियम आहे. त्या पद्धतीने मी वाचवण्याचा धर्म पाळतो. ते डंका मारत आहेत तो त्यांचा धर्म आहे.

यावेळी कल्याणराव पाटील, बाळराजे पाटील, अजिंक्यराणा पाटील, प्रकाश चवरे, रामदास चवरे, डॉ. संदेश कादे, सुनील सातपुते, दीपक माळी, असलम चौधरी, हरिचंद्र चवरे, संजीव खिलारे, सुनील चव्हाण, राहुल कसबे, ज्योत्स्ना पाटील, जालिंदर लांडे, नागेश साठे, धनाजी गावडे, बापू कारंडे, सतीश भोसले, शशिकांत पाटील, चंद्रहार चव्हाण यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


▪️ तालुक्याचे वाटोळ होऊ देऊ नका 

- विकासाचे व्हिजन नसणारी ही टोळी तालुक्याचे राजकारण करू पाहत आहे. उमेदवारी दाखल होऊन प्रचार संपला. एकाही भाषणात हे विकासावर बोलले नाहीत. विकास काय असतो, निधी कसा आणायचा असतो यांना माहित नाही. हे लोकं देखील सत्तेत होती. मात्र यांनी टक्केवारीचा बाजार मांडला. आज उमेदवारी बदलण्यासाठी देखील यांनी जनतेला दावणीला बांधले आहे. त्यामुळे उद्या तालुका आणि मतदारसंघ टक्केवारी देतील. त्यामुळे तालुक्याचे वाटोळं होऊ देऊ नका असे आवाहन राजन पाटील यांनी केले. 


Reactions

Post a Comment

0 Comments