शिवसेनेच्या बंडखोर तिन्ही उमेदवारांनी घेतली माघार
महापालिका निवडणुकीत २५ जागा देण्याची अट महाराष्ट्र स्वराज्य
पक्षातील प्रवेशाचा प्रश्न अनुत्तरीत
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला शहर मध्य मतदारसंघासह इतर जागा न मिळाल्याने भाजपाविरुध्द बंडखोरी करून त्यांचे उमेदवार पाडण्याचा एकसंघ निर्णय घेण्यात आला होता. परंतु महापालिकेच्या आगामी निवडणुकीत सन्मानपूर्वक २५ जागा देण्याचे भाजपा’ने मान्य केल्याने शिवसेनेच्या बंडखोर तिन्ही उमेदवारांनी माघार घेतली.
'भाजपा'कडून सन्मानाची वागणूक नसल्याने रागाच्या भरात निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता यापुढे सन्मानाची वागणूक मिळण्याचे अभिवचन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून रविवारी देण्यात आले, असे शिवसेना शिंदे गट पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांनी सांगितले.
सोलापूर शहर मध्य मतदार संघातून आणि दक्षिण सोलापूर मतदार संघातून शिवसेनेने उमेदवारी मागितली होती. हक्काच्या या दोन जागांवर भाजपाने आपले उमेदवार देऊन शिवसेनेच्या मागणीला तिलांजली दिली होती. सोलापूर शहरात शिवसेनेला एकही जागा न मिळाल्याने शिवसैनिक नाराज होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र' करत महाराष्ट्र स्वराज्य पक्षात प्रवेश करुन अमोल शिंदे यांनी शहर उत्तर, मनीष काळजे यांनी शहर मध्य तर उमेश गायकवाड यांनी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मनोज शेजवाल यांच्या निवडणूक समन्वयक म्हणून जबाबदारीही देण्यात आली होती.
विधानसभा निवडणुकीसह यापुढील काळातही सन्मानाची वागणूक मिळावी. महापालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला २५ जागा देण्यात याव्यात, या अटीवर शिवसेनेच्या तिन्ही बंडखोर उमेदवारांनी अर्ज माघार घेतले. त्यांच्या या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या सर्व घडामोडीत त्यांनी महाराष्ट्र स्वराज्य पक्षामध्ये केलेल्या प्रवेशाचा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहिला आहे.
शिवसैनिकांचे स्वप्न, मुख्यमंत्र्यांचा आदेश गेल्या १५ वर्षापासून शिवसैनिकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून माघार घेतली आहे. 'महायुती'चे सर्व उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार केला आहे, अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांनी दिली.
अन्य तिघांच्या अनुपस्थितीची चर्चा !
भाजपाकडून मिळालेल्या प्रस्ताव मंजुरीचा निरोप आणि विविध राजकीय हालचालीनंतर बंडखोरीचा निर्णय घेतलेले अमोल शिंदे यांनी भाजपा शहर उत्तर उमेदवार विजयकुमार देशमुख भेट घेऊन आपल्या या निर्णयाची माहिती दिली. यावेळी भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे, अनंत जाधव, शिवानंद पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र अन्य बंडखोर उमेदवार मनीष काळजे, उमेश गायकवाड आणि मनोज शेजवाल यांच्या अनुपस्थिती ही नाराजी दर्शविणारी आहे का? अशी चर्चा सुरु होती.
0 Comments