सतत परतीच्या पावसामुळे हाता तोंडाला आलेली पिके वाया जाऊ लागली
वैराग (कटूसत्य वृत्त):- गेल्या सात दिवसांपासून दररोज परतीच्या पावसाने सतत आणि जोरदार हजेरी लावल्यामुळे सोयाबीनची सुगी रखडली असून हाता तोंडाला आलेली पिके वाया जाऊ लागली आहेत. त्यात पाऊस सतत कोसळत असल्यामुळे जमिनीचा वापसा लांबत चालला आहे. परिणामी रब्बी हंगामातील ज्वारीची पेरणी देखील पुढे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.बार्शी तालुक्यामध्ये मृग नक्षत्रापासून झालेल्या दमदार पावसामुळे सर्व ओढे, नाले,लघु आणि मध्यम प्रकल्प तुडुंब भरलेले आहेत. दररोज पाऊस पडत असल्याने काढून 'ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजी शेतात उभ्या असून मळणी यंत्र चिखलामुळे नेता येत नाही. ज्या शेतकऱ्यांची सोयाबीनची काढणी चालू आहे ती दररोजच्या पावसामुळे रखडली
असून सोयाबीनच्या शेंगा फुटू लागल्या आहेत.त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे.सध्या सोयाबीनचा ढासळलेला दर वाढलेली मजुरी, मजुरांची कमतरता, पावसामुळे होणारे नुकसान यामुळे सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांना तोट्याचे ठरू लागले आहे. सोयाबीन पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होऊन उत्पादन घटले आहे.सतत पडणाऱ्या पावसामुळे मिरची, भेंडी, कांदा, तसेच भाजीपाला सडू लागला आहे. या पिकांच्या मुळ्या कूजल्या असून त्यांची वाढ खुंटली आहे. दलदलीमुळे कांदा पिवळा पडला असून त्याच्या मुळ्या सडल्या आहेत. अशातच कांदा पिकावर करपा रोगाचा प्रार्दुभाव झालेला असून फवारणीसाठी शेतकऱ्यांची लगभग सुरू झाली आहे. दररोज पहाटे पडणाऱ्या दुहीचा फटका कांदा पिकाला बसत असून कांदा पिकावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. पडलेल्या करपा रोगामुळे कांद्याचे पीक शेतकऱ्याच्या पदरात पडते की नाही, अशी चिंता बळीराजाला लागून राहिली आहे.सध्या खरीप पिकांचा हंगाम संपत आलेला असून आगामी रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा,गहू या पिकांसाठी शेतजमीन तयार करण्यासाठी बळीराजा मशागतीच्या कामात व्यस्त होणार आहे पण सध्या वापसा नाही.यावर्षी सतत पाऊस पडत राहिल्यामुळे खरीप हंगामातील पिकांची आंतरमशागती शेतकऱ्यांना करता आलेल्या नाहीत. त्यामुळे शेतामध्ये गवताचे प्रमाण जास्त असून वापसा नसल्यामुळे शेतकरी तणनाशकाची फवारणी करू लागला आहे. पाऊस कधी थांबणार आणि वापसा कधी होणार या चिंतेने शेतकरी ग्रासला आहे. सध्या परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून जमिनीला पाझर फुटले आहेत. जमीन दलदलयुक्त बनली आहे. वापसा लवकर होणार नसल्याने रब्बी पिकांची पेरणी लांबणार आहे. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले असून त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. सध्या शेतकऱ्यांची अवस्था 'इकडे आड अन् तिकडे विहीर' अशी झाली आहे.

No comments:
Post a Comment