मागासवर्गीयांसाठी असलेला निधी सवर्ण वस्तींत घेतल्याने आ.विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात उच्च न्यायालयात
जनहित याचिका
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा निधीचा इतरत्र आणि गैरवापर झाल्याचा आरोप करत याप्रकरणी सोलापूर महापालिका, जिल्हा नियोजन तसेच इतर अधिकाऱ्यांसह आ. विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती याचिकाकर्ते जयराज नागणसुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी संगनमत करून मागासवर्गीयांसाठी असलेल्या या योजनेतील कामे सवर्ण वस्तींमध्ये करण्यास सुचविले आहे. यामुळे हा मागासवर्गीयांवर अन्याय आहे. दलित वस्ती सुधारणा निधी हा भवानी वॉटर वर्क्स ते चव्हाण फर्निचर हिप्परगा येथे दुहेरी पाइपलाइन मंजूर कामासाठी देण्यात आला आहे. सोलापूर महापालिका प्रशासनाने मागील सहा ते सात वर्षांमध्ये नगरसेवकांच्या निधीमधून जी कामे करून घेतली आहेत त्याच ठिकाणी नगरोत्थान योजनेचा निधी, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे दलित वस्ती सुधारणा निधीचा विनियोग दर्शवून बिले काढण्यात आली आहेत. जवळपास ३१ ठिकाणी अशा प्रकारची कामे झाली आहेत.
काही कामांची तीन ते चार वेळा बिले उचलली आहेत. विभागीय कार्यालय एक ते आठ झोनची ना हरकत पत्रे घेतलेली नाहीत. काही नगरसेवक त्यांचे नातेवाईकच मक्तेदार असल्याचा आरोप याचिकेत केले आहेत. याबाबतचे पुरावेही उच्च न्यायालयात दाखल केल्याचे नागणसुरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
दरम्यान, संबंधित नगरसेवकांवर सहा वर्षे निवडणूक लढविता येऊ नये, अशी कारवाई करण्याची मागणीही न्यायालयात केली आहे. याप्रकरणी संबंधित संबंधितांच्या संपत्तीवर टाच आणावी, असेही याचिकेत नागणसुरे यांनी नमूद केले आहे.
याचिका दाखल केल्याबाबतची प्रत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविल्याचेही नागणसुरे यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेस माजी नगरसेवक रमेश व्हटकर, बसवराज बगले, अमोल वामणे उपस्थित होते.
0 Comments