Hot Posts

6/recent/ticker-posts

शिवस्मारक आणि लोकमंगल फाउंडेशनतर्फे शनिवारपासून किल्ला स्पर्धा

 शिवस्मारक आणि लोकमंगल फाउंडेशनतर्फे शनिवारपासून किल्ला स्पर्धा

 शितल मालुसरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन 

सोलापूर(कटूसत्य वृत्त):- छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ शिवस्मारक आणि लोकमंगल फाउंडेशनतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीनिमित्त किल्ला बनवण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आली आहे, अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळाचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

         ही स्पर्धा शालेय, महाविद्यालय आणि खुल्या गटात होईल. शनिवार दि. २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते मंगळवार दि. २९ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत स्पर्धकांनी शिवस्मारकच्या नवी पेठ येथील प्रांगणात किल्ले बनवायचे आहेत. मंगळवार दि.२९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता किल्ला स्पर्धेचे उद्घाटन हिंदवी स्वराज्याचे सुभेदार तानाजीराव मालुसरे यांच्या १२ व्या वंशज शितल मालुसरे यांच्या हस्ते होणार आहे.

        एका शाळेस १० जणांचा एक गट असे कितीही गट पाठवता येतील. किल्ला बनविण्याकरिता १० बाय १० फुटांची जागा, दगड, माती, मुंबई माती, पाणी संयोजकांकडून प्रत्येक गटाला उपलब्ध करून दिली जाईल. हे किल्ले पाहण्यासाठी नागरिकांना बुधवार दि. ३० ऑक्टोबरपासून सकाळी १० ते रात्री १० पर्यंत खुले राहणार आहेत.

         प्रत्येक गटातील प्रथम विजेत्यास पाच हजार रुपये, द्वितीय विजेत्यास तीन हजार रुपये तर तृतीय विजेत्यास दोन हजार रुपये तसेच सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्याचबरोबर उल्लेखनीय सहभागाकरिता शाळेच्या शिक्षकास, उत्कृष्ट सांघिक काम करणाऱ्या गटास, किल्ल्याची व्यवस्थित माहिती देणाऱ्या गटास विशेष पारितोषिक देण्यात येणार आहेत. या किल्ला स्पर्धेत अधिकाधिक शाळा महाविद्यालयांनी आणि नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांनी केले. 

         या पत्रकार परिषदेस शिवस्मारकचे सचिव गंगाधर गवसने, संचालक प्रा. देवानंद चिलवंत, वरदराज बंग, लोकमंगल फाउंडेशनचे संचालक मारुती तोडकर, व्यवस्थापिका दीपाली कोठारी उपस्थित होते.

नि:शुल्क गड दर्शन सहल

किल्ले स्पर्धेतील सर्व गटातील विजेत्या गटाकरिता श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ शिवस्मारकतर्फे नि:शुल्क गड दर्शन सहल आयोजित करण्यात येणार आहे.


Reactions

Post a Comment

0 Comments