मविआतुन बबनराव शिंदेंच्या उमेदवारीला मोहिते पाटलांचा विरोध; माढ्यातलं राजकारण तापणार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- लोकसभेला मोहिते पाटील घराण्याने भाजपला रामराम करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर सोलापूरच्या राजकारणातील समीकरणे बदलल्याचे दिसत आहे.दरम्यान अजित पवार गटाचे माढ्याचे आमदार बबन शिंदे यांना महाविकास आघाडीतून उमेदवारी देण्यास खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी विरोध केल्याने चर्चांना सुरुवात झाली आहे.
आमदार बबन शिंदे यांनी शरद पवारांची भेट घेऊन माढ्यातून उमेदवारीची मागणी केली आहे. आतापर्यंत आमदार शिंदे यांनी शरद पवारांची तीन वेळा भेट घेतली आहे. (दि.१६) बुधवारी देखील आमदार शिंदे यांनी पवारांची भेट घेतली. भेटीनंतर आता माढ्यात राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
दरम्यान माढा तालुक्यातील मानेगाव येथील एका कार्यकर्त्याने थेट खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना फोन करून गद्दारांच्या हाती तुतारी देऊ नका, अशी विनंती करत आमदार शिंदेंना उमेदवारी देऊ नका असे म्हंटले. यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आमच्या कुटुंबाचाही आमदार शिंदेंना महाविकास आघाडीची उमेदवारी देण्यास विरोध असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे माढ्यातले राजकारण आता अधिकचे रंगू लागल्याचे दिसत आहे.
0 Comments