शरद पवार गटाची पाचवी उमेदवारी यादी जाहीर
मुंबई(कटूसत्य वृत्त):- विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी, महायुती, तसेच इतर पक्षांकडूनही उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात येत आहेत. आज (२९ ऑक्टोबर) राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची शेवटची म्हणजेच पाचवी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत ५ जणांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून जाहीर करण्यात आलेल्या ५ उमेदवारांच्या यादीत माढ्यामधून अभिजीत पाटील, मुलुंडमधून संगीता वाजे, वरुड मोर्शीतून गिरीश कराळे, पंढरपूरमधून अनिल सावंत आणि मोहोळमधून राजू खरे यांना तिकीट देण्यात आलं आहे. दरम्यान, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून याआधी चार याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.
शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख यांना काटोल विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, अनिल देशमुख यांनी विधानसभा निवडणुकीच्या मैदानातून माघार घेतली आहे. त्यांच्या ऐवजी त्यांचा मुलगा सलील देशमुख हे आता निवडणुकीच्या मैदानात असणार आहेत. अनिल देशमुख यांनी माघार घेतल्यामुळे आता पक्षाकडून त्यांच्या मुलाला उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून २४ ऑक्टोबर रोजी ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर २६ ऑक्टोबर रोजी २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा २७ ऑक्टोबर रोजी ९ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली होती. यानंतर आता आज ७ उमेदवारांची यादी चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, विधानसभेच्या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे, या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता उद्या २९ ऑक्टोबर रोजी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे अनेक नेत्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
0 Comments