सहकारी संस्थांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणार
महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे नूतन अध्यक्ष राजन पाटील यांची माहिती
माझ्यावरील सर्व आरोपांना जनताच उत्तर देईल

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्य सहकार परिषद ही शासन आणि सहकारी संस्थांमधील दुवा आहे. या माध्यमातून सहकारी संस्था आणि सभासदांच्या सभासदांचे हित साधण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी राज्यभर दौरा करून संवाद साधणार आहे असे सांगतानाच कुणीही कितीही प्रतिमा मलीन केली तरी माझ्या परिवाराला माझ्यासह परिवाराला सर्व गुणदोषांसह जनता स्वीकारते. माझ्यावरील सर्व आरोपांना जनताच उत्तर देईल, असे महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे नूतन अध्यक्ष माजी आ. राजन पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे नूतन अध्यक्ष राजन पाटील यांनी आज सोलापूर श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषद घेऊन आपली पुढील वाटचाल आणि विविध विषयांवर भूमिका मांडली. या परिषदेच्या माध्यमातून सहकारी चळवळीशी संबंधित बाबींवर राज्य शासनाला सल्ला देणे, राज्यातील सहकारी चळवळींचा आढावा घेऊन सहकारी संस्थांच्या कार्याचा समन्वय साधण्याचे मार्ग सुचवणे, राज्यातील सहकारी चळवळीच्या विकासाबाबतच्या योजना व धोरणे यांची शिफारस करणे यासह सहकारी संस्था व सभासदांचे हित साधण्याचा प्रयत्न करणार आहे. या माध्यमातून मिळावे तज्ञ लोकांशी चर्चा तसेच इतर उपक्रम घेण्यात येणार आहेत, असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच सोलापुरात जिल्हा मध्यवर्ती बँकेत आढावा बैठक घेतली. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. विविध अडचणी जाणून घेतल्या. यानंतर कार्यवाही करण्याचा प्रयत्न राहणार आहे, असेही यावेळी माजी आ. पाटील यांनी सांगितले.
यावेळी सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरचिटणीस सागर सुरवसे, राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रमोद बोडके आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
मी नव्हे तर सभासदांनीच निर्णय घेऊन कारखाना पब्लिक लिमिटेड केला
सहकारी तत्त्वावरील साखर कारखाना खाजगी केला अशा व्यक्तीस अध्यक्षपद दिले असा आरोप होत आहे या प्रश्नाच्या उत्तरात बोलताना पाटील म्हणाले, सहकारी तत्त्वावरील साखर कारखाना पब्लिक लिमिटेड केला. तो मी नाही तर दहा हजार सभासदांनी ठराव करून केला आहे. त्याचे रेकॉर्डिंग आहे. सभासदांचे सर्व अधिकार अबाधित आहेत. इक्विटी मेंबर ते आहेत. त्यामुळे सभासदांचे हित साधले गेले आहे. आज खाजगी व सहकारी कारखान्याच मोठी स्पर्धा आहे. शासनाच्या लाल फितीतून जायला विलंब होतो. यामुळे सर्वांनुमते सभासदांनी तो निर्णय घेतला. पब्लिक लिमिटेड कारखाना केल्यामुळे सभासदांना शैक्षणिक व आरोग्य विषयक सोयी सुविधा उपलब्ध करता येत आहे. सभासदांच्या सुखदुःखात मदत देता आली, असेही त्यांनी सांगितले.
भौगोलिक दृष्ट्या सोयीसाठीच अनगरला अप्पर तहसील कार्यालय
अपर तहसील कार्यालय नगर येथे केल्यावरून तालुक्यात विरोध झाला या संदर्भात बोलताना ते म्हणाले, यामध्ये माझा काहीही स्वार्थ नाही. तहसील कार्यालय मोहोळ येथेच आहे. ते कुठेही हलवले नाही. भौगोलिक दृष्ट्या लोकांच्या सोयीसाठीच अनगर येथे अप्पर तहसील कार्यालय करण्यात आले.
आमदार माने हेच उमेदवार राहतील
मोहोळ विधानसभा मतदारसंघात आमदार यशवंत माने यांनी सुमारे 3 हजार कोटींची कामे केली आहेत. मोठा निधी आणला. निवडणूक लढविणे सोपे नाही. चांगला उमेदवार आवश्यक असतो.आमदार यशवंत माने हेच चांगले उमेदवार आहेत. पक्ष चारित्र्यशील उमेदवाराच्या पाठीशी राहील अशी मला पूर्ण खात्री आहे, असेही माजी आ. पाटील म्हणाले.
कोणीही, कितीही प्रतिमा मलीन केली तरी...
विविध प्रकारचे आरोप केले जातात त्याबद्दल काय सांगाल या प्रश्नाच्या उत्तरात माजी आ. पाटील म्हणाले, कुणीही कितीही प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला तरी माझ्या परिवाराला माझ्यासह गुणदोषासह लोक स्वीकारतात. दादागिरीचे राजकारण किती दिवस चालते ?
हुकूमशाही असल्याचा आरोप केला जातो मात्र खरी लोकशाही अनगर गावात पाहायला मिळेल. सूत्रे कोणाच्या हाती ठेवायची हे मतदार ठरवतील. सर्व आरोपांना जनता उत्तर देईल, असेही यावेळी माजी आमदार राजन पाटील यांनी स्पष्ट केले
आम्ही धर्म पाळला ..!
सोलापूर लोकसभा निवडणुकीत मोहोळ मतदार संघात 63 हजाराचा लीड काँग्रेस उमेदवाराला मिळाला याबद्दल बोलताना ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकांसाठी पुन्हा मतदारांसमोर आम्ही जाणार आहोत. आम्ही धर्म पाळला आहे ,असेही पाटील यांनी सांगितले.
0 Comments