Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर बाजार समितीत कांद्याची आवक वाढली, जुन्या कांद्याच्या दरात घसरण

 सोलापूर बाजार समितीत कांद्याची आवक वाढली, जुन्या कांद्याच्या दरात घसरण

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यात जुन्या कांद्याला चांगला भाव मिळत आहे. मागच्या दोन दिवसांत सोलापूर बाजारसमितीत ६५४ वाहनांच्या कांद्याची आवक झाली आहे. यामुळे जुन्या कांद्याला प्रतिक्विंटल ३ हजार ते ५ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे.

तर नवीन कांद्याला सोलापूर बाजार समितीत मंगळवारी (ता. ०८) २ ते ४ हजारांपर्यंत दर होता. पावसाने भिजलेल्या कांद्याला प्रतिकिलो १० ते १५ रुपयांचा दर मिळाला.

सोलापूर बाजार समितीत नगर, नाशिक, धाराशिव, पुणे जिल्ह्यातून जुन्या कांद्याची आवक होत आहे. मागच्या दोन दिवसांत आवक झालेल्या ३२५ वाहनांपैकी २०० वाहने जुना कांदा होता. तर १२५ वाहनांमध्ये नवीन कांद्याची आवक झाली होता. म्हसवड, फलटण, माळशिरस, कर्नाटक, बागलकोट, विजयपूर, कलबुर्गी येथून नवीन कांदा सोलापूर बाजार समितीत विक्रीसाठी येत आहे.

आवक वाढल्याने दरात काहीशी घसरण झाली आहे. ५ हजार ५०० रुपये क्विंटलने जाणारा कांदा आता आवक वाढल्याने ३ ते ४ हजार रुपयांपर्यंत विकला जातोय. सोलापूर जिल्ह्यातील नवीन कांदा बाजारात यायला अजून एक महिन्याचा अवधी आहे. तत्पूर्वी, दर कमी झाल्याने बळिराजाची चिंता वाढू लागली आहे. त्यातच पुन्हा शेतकऱ्याला विकलेल्या कांद्याचे बिल रोखीने मिळत नाही. किमान १५ हजार रुपयांपेक्षा जास्त बिल झाल्यास त्यांना १५ दिवसांची तारीख टाकलेला धनादेश (चेक) दिला जात असल्याची खंत तेथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

सोलापूर बाजार समितीत मागील दोन दिवसांत ६५४ वाहने कांदा आला, यामध्ये कर्नाटकमधून कांद्याची आवक वाढली आहे. परंतु कर्नाटकातील बंगळुरु बाजारात १ हजाराहून अधिक वाहने गेल्याने सोलापूर बाजार समितीमध्ये आवक काहीशी कमी होणार आहे.

सद्या नवीन कांद्याला सोलापूर बाजार समितीत प्रतिक्विंटल कमाल दर ३ हजार ५०० रुपये ते ४ हजार रुपये तर सरासरी दर २ हजार रुपये आहे. आगामी काळात कांद्याची आवक वाढली तरी देखील कांद्याचे दर तेजीत राहतील असा अंदाज बाजार समितीतील अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments