जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती देण्यात आली
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जिल्हास्तरीय समित्यांचे नोडल अधिकारी, जिल्ह्याच्या सर्व 11 विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच राजकीय पक्ष व उमेदवाराच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियुक्त केलेल्या सर्व अधिकारी कर्मचारी यांनी त्यांच्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी. निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक राजकीय पक्ष व उमेदवाराच्या खर्चाच्या प्रत्येक बाबीवर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून तो खर्च संबंधित उमेदवाराच्या खर्च नोंदवहीत नोंदवला गेला पाहिजे याची दक्षता घ्यावी, असे निर्देश निवडणूक खर्च निरीक्षक के. पी. जयकर, मीना तेजराम श्रीमनलाल व बी. ज्योती किरण यांनी दिले.
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय नोडल अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आढावा बैठकीत सर्व निवडणूक खर्च निरीक्षक मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस शहर आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पोलीस शहर उपायुक्त दिपाली काळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी यांच्यासह सर्व नोडल अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.
निवडणूक खर्च निरीक्षक जयकर पुढे म्हणाले की, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सर्व नूडल अधिकारी सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी उमेदवाराच्या खर्चाच्या बाबीवर नियंत्रणासाठी सर्व आवश्यक कार्यवाही केलेली आहे. जिल्हास्तरीय खर्च समिती तसेच प्रत्येक विधानसभा मतदारसंघात खर्च समितीची स्थापना झालेली असून त्यांना प्रशिक्षण ही देण्यात आलेले आहे. एस. एस. टी., व्हीएसटी, फ्लाईंग स्कॉड या टीमसह एमसीएमसी समितीची स्थापना झालेली असून या सर्व टीम अत्यंत बारकाईने निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवून तो खर्च उमेदवाराच्या खर्च नोंदवहीत नोंदवला जाईल याची काळजी घेतील. त्याप्रमाणेच जिल्ह्यातील सर्व बँकांनी बँका बरोबरच मोबाईल ॲप्लिकेशन मधील यूपीआय अन्य ऑनलाईन पेमेंट सिस्टीम द्वारा होणाऱ्या प्रत्येक पेमेंटवर, ट्रांजेक्शनवर लक्ष ठेवावे, त्यातील संशयास्पद व्यवहारांची माहिती तात्काळ निवडणूक विभागाला द्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
सर्व निवडणूक यंत्रणांनी निवडणूक कालावधीत लहान लहान बाबीवर लक्ष ठेवावे. राजकीय पक्ष व उमेदवार यांच्याकडून उमेदवारांना आमिष म्हणून साड्या व अन्य लहान लहान इलेक्ट्रॉनिक वस्तू भेट म्हणून देण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी अशा बाबीवर पोलीस यंत्रणेसह सर्व निवडणूक खर्च पथकांनी काळजीपूर्वक काम करावे. व ही निवडणूक प्रक्रिया अत्यंत शांततापूर्ण वातावरणात होण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन निवडणूक खर्च निरीक्षक बी. ज्योती किरण यांनी केले.
मागील दोन दिवसापासून सोलापूर शहर उत्तर सोलापूर शहर मध्य सोलापूर शहर दक्षिण व अक्कलकोट या चार विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी भेटी देऊन निवडणूक कामकाजाची माहिती घेतली. तसेच निवडणूक यंत्रणेने केलेल्या तयारीचा आढावा घेतला असून निवडणूक प्रशासनाने तयारी चांगली केली असून सर्व नियुक्त केलेल्या पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी असे निर्देश निवडणूक खर्च निरीक्षक मीना तेजराम श्रीमनलाल यांनी दिले.
प्रारंभी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अनुषंगाने जिल्हा निवडणूक प्रशासनाने जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात जिल्हास्तरीय विविध समित्यांचे नोडल अधिकारी तसेच विधानसभा निहाय निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केलेल्या तयारीची माहिती दिली. तसेच जिल्हा निवडणूक प्रशासन निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे राबवण्यासाठी पूर्णपणे सज्ज असून उमेदवाराच्या निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध समित्या तसेच पथकांची निर्मिती करण्यात आलेली आहे, अशी माहिती देऊन सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचे प्रशिक्षणही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार व पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सोलापूर शहर व जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कायदा व व्यवस्था चोख ठेवण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तर जिल्हास्तरीय खर्च समितीच्या नोडल अधिकारी श्रीमती मीनाक्षी वाकडे यांनी खर्चाच्या प्रत्येक बाबीवर जिल्हास्तरीय समिती तसेच विधानसभा निहाय नियुक्त केलेल्या खर्च समितीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे प्रशिक्षण देण्यात आल्याचे सांगितले.
यावेळी निवडणूक खर्च निरीक्षक यांनी सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, उत्पादन शुल्क कार्यालय, वस्तू व सेवा कर कार्यालय, आयकर विभाग तसेच जिल्हास्तरीय माध्यम व प्रमाणीकरण समिती व जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक तसेच सर्व बँकर्स यांनी केलेल्या निवडणूक तयारीची माहिती घेऊन त्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या.
*जिल्ह्यात 11 विधानसभा मतदारसंघासाठी तीन निवडणूक खर्च निरीक्षक यांची नियुक्ती....
के. पी. जयकर हे केंद्रीय राजस्व सेवेतील अधिकारी असून भारत निवडणूक आयोगाने त्यांची नियुक्ती निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून सोलापूर जिल्ह्यात केलेली आहे. पंढरपूर, माळशिरस व सांगोला या तीन विधानसभा मतदारसंघासाठी ते निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून कामकाज पाहणार आहेत. उपरोक्त तीन विधानसभा मतदारसंघातील निवडणूक खर्चाची संबंधित कोणत्याही प्रकारची तक्रार असेल तर ती तक्रार 99 62 45 25 0 2 या भ्रमणध्वनी क्रमांकावर करावी असे आवाहन त्यांनी केले आहे.
बी. ज्योती किरण-
ह्या केंद्रीय राजस्व सेवेतील अधिकारी असून भारत निवडणूक आयोगाने त्यांची नियुक्ती निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून सोलापूर जिल्ह्यात केलेली आहे. करमाळा, माढा, बार्शी व मोहोळ या चार विधानसभा मतदारसंघासाठी त्या निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून कामकाज पाहणार आहेत. उपरोक्त चार विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना निवडणूक खर्चाशी संबंधित कोणत्याही प्रकारची तक्रार असेल तर 94 25 010500 या भ्रमणध्वनी क्रमांकावर करावी असे आवाहन करण्यात येत आहे.
0 Comments