लोकशाहीच्या आडून हुकूमशाही सुरु -अॅड. असीम सरोदे
बार्शी (कटूसत्य वृत्त):-संविधानातील आम्ही भारतीय लोक म्हणजे गणराज्य व संघराज्य आहे. त्यामुळेच संविधानातील कलम एकमध्ये इंडिया म्हणजे भारत सगळ्या राज्यांचे एक संघराज्य असेल, असे म्हटले आहे. येथील गण म्हणजे नागरिक आपले लोकप्रतिनिधी निवडून देतील व संघराज्य कारभार चालावा ही संविधानाची रचना मान्य नसलेले राजकीय नेते एककेंद्री सत्ता निर्माण करून लोकशाहीच्या आडून हुकूमशाही चालवित आहेत, असे परखड मत संविधान विश्लेषक अॅड. असीम सरोदे यांनी मांडले.
यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृह, बार्शी येथे संविधान जागृती अभियान आयोजित बार्शी संविधानातील आम्ही भारतीय लोक या विषयावर बोलताना अॅड. असीम सरोदे. 'संविधानातील आम्ही भारतीय लोक' या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. काका गुंड होते. मनीष देशपांडे आणि कृतार्थ शेवगावकर यांनी निर्मिती केलेल्या भारतीय संविधान उद्देशिका तक्त्याचे प्रकाशन अॅड. सरोदे यांच्या हस्ते झाले.
अॅड. सरोदे पुढे म्हणाले, वृत्तपत्र माध्यमे, जाहिराती यांचा वापर खोटे चित्र निर्माण करण्यासाठी मायावी प्रयोग म्हणून होतो आहे. त्यामुळे स्वार्थी राजकारण्यांना कुणी नागरिक नकोत तर मतदार हवेत. असत्यच सत्य म्हणून विनधोकपणे वावरू शकेल, महत्त्वाच्या पदांवर वसून जनतेचा पैसा उधळू शकेल, अशी सोय तयार करुन देणारे देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील राजकीय वातावरण नासवले. आज एकनाथ शिंदे यांचे संविधानिक नैतिकता उधळून टाकणारे सरकार राज्यात आहे, असा आरोप करून सरोदे म्हणाले, आता अत्यंत प्रामाणिक संविधानिक विचार करणारे नागरिक राज्यातील सत्ताबदल घडवून आणतील. लोकशाही हवी, लोकसहभाग हवा, पण आम्ही राजकीय विचार करणार नाही, असा विचार करणे नागरिकांनी सोडले पाहिजे, असा सल्ला अॅड. सरोदे यांनी दिला. अॅड. श्रीया आवळे म्हणाल्या, कौटुंबिक केसेस, घटस्फोट व फौजदारी केसेसमधून नवीन दृष्टिकोन मांडण्याचा प्रयत्न प्रचलित न्यायव्यवस्थेत आम्ही करतो. कार्यक्रमासाठी सुमित खुरंगळे, आकाश दळवी, विवेक गजशिव, उमेश नेवाळे, मनीष देशपांडे, डॉ. अशोक कदम, डॉ. दिलीप कदम आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता देव यांनी केले.
.jpg)
0 Comments