Hot Posts

6/recent/ticker-posts

जिल्हाधिकाऱ्यांकडून सोलापूर शहरातील शाळांना उद्या सुट्टी जाहीर!

 जिल्हाधिकाऱ्यांकडून सोलापूर शहरातील शाळांना उद्या  सुट्टी जाहीर! 

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र शासनाने काढलेल्या सगेसोयऱ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करून मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात उद्या  (बुधवारी) सोलापूर शहरातून शांतता रॅली काढली जाणार आहे.

त्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील शाळांना जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या दरम्यान लोक एकत्रित जमा होऊन शांतता रॅली काढून सभा होणार आहे. त्यानंतर सरस्वती चौकमार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जरांगे पाटील अभिवादन करायला जाणार आहेत. त्यामुळे या मार्गावर लोकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे. रॅली कार्यक्रमाच्या ठिकाणी येणाऱ्या वाहनांचा अडथळा निर्माण होवून वाहतुकीची कोंडी होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. ७ ऑगस्टला सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत मराठा आरक्षण शांतता रॅलसंबंधाने छत्रपती संभाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक हा मार्ग सर्वच वाहनांसाठी बंद ठेवला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर अप्पर जिल्हादंडाधिकारी मनिषा कुंभार यांनी शहरातील शाळांच्या सुटीचा आदेश काढला आहे.

आदेशातील ठळक बाबी...

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सोलापूर शहरात शांतता रॅली काढली जाणार असल्याने रस्त्यांवर मोठी गर्दी होणार आहे. सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत छत्रपती संभाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक हा मार्ग वाहतुकीसाठी राहणार बंद

रॅलीसाठी शहर-जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर लोक येतील; त्यामुळे शहरातील विविध शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांना अडचणी येवू शकतात. त्यामुळे शहरातील सरकारी, खासगी, अनुदानित, विनाअनुदानित शाळा, आश्रमशाळा, महाविद्यालये व व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रांना उद्या  (बुधवारी) सुट्टी राहील.

विद्यार्थ्यांना शाळेला सुट्टी असेल, पण शाळा, संस्थांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून काम करायचे आहे, असेही आदेशात नमूद आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments