पिंपरी दुमाला शाळेतील विद्यार्थ्यांना लागली वाचनाची गोडी
शिरूर (कटूसत्य वृत्त):- विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनापासून पाठ्यपुस्तकासोबत अवांतर पुस्तक वाचनाची सवय निर्माण होणे आवश्यक असल्याचे मत अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, शिरूर चे अध्यक्ष राहुल चातुर यांनी व्यक्त केले आहे. कैलाश सत्यार्थी चिल्ड्रेन्स फाउंडेशन,नवी दिल्ली या संस्थेच्या वतीने जिल्हा परिषद शाळा पिंपरी दुमाला व परिसरातील एकुण ४० शाळांना वाचनालय उपलब्ध करून देण्यात आले आहे. या वाचनालयातील पुस्तकांच्या वितरण प्रसंगी संस्थेच्या प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला.
जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी अवांतर वाचनाच्या पुस्तकांची आवश्यकता असल्याचे निरीक्षण बालकुमार साहित्य संस्थेने नोंदवले होते, त्याविषयीची मागणी या संस्थेकडे करण्यात आली होती.कैलाश सत्यार्थी फाउंडेशन ही संस्था शिरूर तालुक्यातील चाळीस गावांमध्ये बालविवाह,बाल शिक्षण,बालमजुरी व निराधार बालकांसाठी कार्य करत आहे.या कामाचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांच्या वाचन संस्कृतीचा विकास व्हावा हा उद्देश समोर ठेवून संस्थेने या गावातील शाळांना पुस्तके व खेळाचे साहित्य वितरित केले आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी वाढली आहे
शिरूर तालुका ग्रंथालय संघाचे अध्यक्ष विवेकानंद फंड यांनी विद्यार्थ्यांना वाचन विकासाचे टप्पे याविषयी मार्गदर्शन केले तसेच ग्रंथालयाच्या नोंदी करण्यासंबंधी माहिती दिली याप्रसंगी फाउंडेशनचे प्रोजेक्ट प्रतिनिधी निंबाजी नरवडे, शोभा डोळस उपस्थित होते.सरपंच महेंद्र डोळस, उपसरपंच शरद खळदकर ,शाळा समिती अध्यक्ष शशिकांत चिखले,उपाध्यक्ष वर्षा खळदकर यांनी मदतीबद्दल फाऊंडेशनचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांताराम शिंदे यांनी केले.पिंपरी दुमाला शाळेच्या या उपक्रमाबद्दल केंद्रप्रमुख यशवंत रणदिवे यांनी कौतुक केले आहे.
विद्यार्थी प्रतिक्रिया -
रंगीत पुस्तके व चित्रे पाहून आनंद झाला. पुस्तकातील गोष्टी वाचून फार मजा येते. मी आता दररोज एक तरी गोष्ट वाचते.
-कु. स्वरा रमेश चिखले
इयत्ता तिसरी
0 Comments