Hot Posts

6/recent/ticker-posts

विडी व यंत्रमाग कामगारांना किमान वेतन व १० हजार रुपये पेन्शन देण्यास भाग पाडू- कॉ. आडम मास्तर

 विडी व यंत्रमाग कामगारांना किमान वेतन व १० हजार रुपये पेन्शन देण्यास भाग पाडू- कॉ. आडम मास्तर

महाराष्ट्राच्या अस्मितेला नख लावणाऱ्या शिंदे सरकारने राजीनामा द्यावा हा ठाराव


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूरात असंख्य कामगार आहेत. प्रामुख्याने कामगारांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूरात १०० वर्षाहून अधिक वर्षापासून कामगार काम करत आहेत. परंतु यांना कामगार कायद्याचे लाभ मिळत नाहीत. तसेच कामगार कायद्याच्या हक्क व अधिकारांपासून जाणीवपूर्वक वंचित ठेवण्याचा डाव इथल्या कारखानदारांनी आणि प्रशासकीय यंत्रणेनी रचलेला आहे. कामगारांच्या एकजूटीवर अनेक तीव्र आंदोलने करून इथल्या व्यवस्थेला सुरुंग लावण्याचे काम कामगार चळवळीने केलेला आहे. कामगारांना किमान वेतन, निवृत्ती वेतन १० हजार रुपये आणि सामाजिक सुरक्षा देणे बंधनकारक व अनिवार्य आहे. मात्र शासनाची उदासीनता, प्रशासनाची दिरंगाई यामुळे कामगारांचे मोठे नुकसान होत आहे. म्हणूनच आगामी काळात या लढाईची धार आणखी तेज व उग्र स्वरूपाची राहील आणि श्रमिकांना शासनाकडून सामाजिक सुरक्षेचे कवच देण्यास शासनाला भाग पाडू असा लक्षवेधी इशारा कामगारांच्या मेळाव्यात ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी दिला.
बुधवार दि. २८ ऑगस्ट २०२४ रोजी दत्त नगर लाल बावटा कार्यालय येथे श्रमिकांचा विभागीय निर्धार मेळावा माजी नगरसेविका कॉ. सुनंदाताई बल्ला यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेवक व्यंकटेश कोंगारी, अशोक बल्ला, ॲड.अनिल वासम, श्रीनिवास कुणे, वीरेंद्र पद्मा, बाळकृष्ण मल्याळ आदींची उपस्थिती होती.
या मेळाव्याची सुरुवात  रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा नौदल दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मालवण येथे ४ डिसेंबर २०२३ रोजी मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडला. नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची यशोगाथा तळागाळात रुजविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. हे अत्यंत गंभीर व आक्रोशजनक आहे.
सदर पुतळ्याची उभारणी करताना शास्त्रोक्त पध्दतीने व तांत्रिकदृष्ट्या योग्य मार्गदर्शन पद्धतीचा अवलंब न केल्याची शंका उपस्थित होत असून यामध्ये अनेक लोकांचे हात काळे झाल्याचे समजते. याची सखोल चौकशी करून महाराजांचा पुतळा कोसळण्यास जबाबदार असणारे मूर्तिकार, अभियंता, तंत्रज्ञ आणि संबंधित विभागातील दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे श्रध्दास्थान व अस्मितेला नख लावणाऱ्या बेजाबदार शिंदे सरकार यांनी जनभावना व जनतेचा प्रक्षोभ लक्षात घेऊन सदर घटनेची जबाबदारी स्वीकारत तात्काळ राजीनामा द्यावा. असा ठराव माकपाचे जिल्हा समिती सदस्य अनिल वासम यांनी मांडला. त्यास मेळाव्यातील सर्वांनी एकमताने मंजुरी दिली.

यावेळी पुढे बोलताना आडम म्हणाले कि, आज महाराष्ट्र अत्यंत गंभीर आणि वेगळ्या वळणावर चालत आहे. शासनाचे अपयश लपवून ठेवण्यासाठी रोज एक नवीन योजना जाहीर करून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होत आहे. अत्याचारांच्या घटनांची मालिका चालू असून पोलीस प्रशासन आणि गृहखाते काय करत आहेत असा सवाल सर्वसामान्यांच्या मनात आहे. प्रत्येकाला असुराक्षतेची भावना जाणवत असून जनतेला स्थिर आणि जनतेची धोरणे राबवणाऱ्या सरकारची गरज आहे. हि जनतेची भावना आणि वस्तुस्थिती लक्षात घेऊन महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या माध्यमातून महायुतीच्या सरकारच्या भ्रष्ट आणि गोरख धंद्याचा पाडा वाचला जात आहे. याकडे सर्वांनी लक्ष केंद्रित करून पुरोगामी महाराष्ट्र घडविण्यासाठी महाविकास आघाडीला सत्तेत येण्याची संधी द्यावी. असे नम्र आवाहन केले.
सदर मेळाव्यात उपस्थित असलेले सर्व कामगार बंधू-भगिनींनी आगामी विधान सभा निवडणुकीत कामगारांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी स्वतःच्या कमाईतील पैसे निवडणूक निधी देणार व कॉ. आडम मास्तर यांना आमदार करण्यासाठी सामुदायिक जबाबदारी घेण्याचे एकमुखी निर्धार करण्यात आला.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक बल्ला, शिवा श्रीराम, सनी कोंडा, किशोर गुंडला, बालाजी गुंडे, बलराज म्हेत्रे, श्रीनिवास तंगडगी, प्रशांत विटे, प्रकाश कुऱ्हाडकर, गोपाळ जकलेर, अंबादास गाडगी, प्रवीण आडम आदींनी परिश्रम घेतले.
प्रास्ताविक अशोक बल्ला यांनी केले. या मेळाव्याचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲड.अनिल वासम यांनी केले.

Reactions

Post a Comment

0 Comments