शांतता रॅली मनोज जरांगे यांचे बारा वाजता होणार आगमन
पोवाड्याच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील
यांचा संघर्ष देखील सादर होणार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-मराठा आरक्षण व कुणबी मध्ये सग्या सोयऱ्यांचा समावेश करावा या मागणीसाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलन अंतर्गत शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात बुधवार ७ ऑगस्ट रोजी सोलापुरातून होणार असून या शांतता रॅलीसाठी जरांगे पाटील यांचे दुपारी बारा वाजता येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात आगमन होणार आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर तेथून ते रॅलीने छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करणार आहेत. त्यानंतर तेथेच उभारण्यात आलेल्या भव्य व्यासपीठावरून ते मराठा समाज बांधवांना संबोधीत करणार आहेत.
दरम्यान सकाळपासून जरांगे पाटील यांचे आगमन होईपर्यंत शिवशाहीर यांची तोफ धडाडणार आहे .छत्रपती शिवाजी महाराज चौकात अरविंद घोगरे हे शिवशाहीर विविध पोवाड्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज, तसेच मराठ्यांचा इतिहास सादर करणार आहेत. याशिवाय मनोज जरांगे पाटील यांच्या संघर्षाची कहाणीही ते ऐकवणार आहेत. तसेच छत्रपती संभाजी महाराज चौकात सकाळच्या सत्रामध्ये सोलापूरचे तरुण शिवशाहीर ... यांचे पोवाडे ऐकायला मिळणार आहेत.
सभेनंतर जरांगे पाटील हे आपल्या निवडक समर्थकांसह पार्क चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि अहिल्यादेवी होळकर आदी महामानवांना अभिवादन करणार आहेत. सोलापूरचे चार हुतात्मे या महामानवांना अभिवादन देखील करणार आहेत ही शांतता रॅली यशस्वी करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे अमोल शिंदे , दास शेळके, अनंत जाधव, रवी मोहिते , श्रीकांत घाडगे , शेखर फंड , विजय पोखरकर , महेश सावंत , बाळासाहेब गायकवाड , दिलीप कोल्हे परिश्रम घेत आहेत.
सभेनंतर जरांगे पाटील यांचा सोलापुरात रात्री मुक्काम राहणार आहे .मुक्कामाला त्यांच्या समवेत आलेले शंभर सहकारी विजापूर रोडवरील मयूर वन मंगल कार्यालयात मुक्कामास असणार आहेत. तर जरांगे पाटील यांच्यासाठी खास एक बंगलो राखीव ठेवण्यात आला आहे .त्या बंगल्यामध्ये ते मोजक्या समर्थकांसह मुक्काम करणार आहेत . दुसऱ्या दिवशी सकाळी कामती मार्गे मंगळवेढा कडे रवाना होणार आहेत.
मनोज जरांगे यांच्या सभेसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य गोलाकार पद्ध्तीचे व्यासपीठ उभारणीचे काम पूर्ण झाले असून त्याला अंतिम स्वरूप देण्यात येत आहे. या व्यासपीठावर लेजर शो ची व्यवस्था करण्यात आली असून जरांगे पाटलांच्या आगमनाच्या वेळी या लेझर शोचा आणि आतिषबाजी केली जाणार आहे.
0 Comments