पत्रकार अमोल मोरे यांना दमदाटीचा सोलापुरात पत्रकार संघटनांकडून निषेध
खा. नारायण राणे यांच्यावर कार्यवाहीच्या मागणीचे दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सोलापूर : राजकोट किल्ल्यावर घडलेल्या घटनेची पाहणी करण्यासाठी आले असताना भाजप खा. तथा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वृत्तांकन करणाऱ्या एबीपी वृत्तवाहिनीचे पत्रकार अमोल मोरे यांना धमकावल्याच्या घटनेचा निषेध नोंदवत खा. राणे यांच्यावर कार्यवाही करावी या मागणीचे निवेदन सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, सोलापूर च्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या ठिकाणी कोसळला त्या जागेचा आढावा घेताना संतापाने पत्रकारांचा माईक हिसकावून घेणे, पत्रकारांशी अरेरावी करणे हे नारायण राणे यांचे वर्तन पूर्णपणे अयोग्य असून आम्ही याचा निषेध करतो. पत्रकारांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे आणि समाजातील या जागल्याना त्यांचे काम करण्यापासून राणे किंवा अन्य कोणीही रोखू वा धमकावू नये, हीच श्रमिक पत्रकार संघाची भूमिका असल्याचे श्रमिक पत्रकार संघांचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष मनिष केत यांनी सांगितले.
दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची तात्काळ दखल घेऊन उचित कार्यवाही करावी अशी मागणी देखील निवेदनद्वारे करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी हे निवेदन स्वीकारले.
लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांशी कर्तव्य बजावत असताना अशा पद्धतीची अरेरावी करणाऱ्या प्रवृत्तीला रोखण्यात यावे अशी मागणी देखील पत्रकार संघटनानी निवेदनद्वारे केली आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे अध्यक्ष मनिष केत, श्रमिक पत्रकार संघांचे चिटणीस आफताब शेख, माजी उपाध्यक्ष किरण बनसोडे, सुमित वाघमोडे, संदीप वाडेकर, मिलिंद राऊळ, आप्पा बनसोडे, अभिषेक आदेप्पा, प्रीतम पंडित आदी पत्रकार उपस्थित होते.
0 Comments