लोकमंगल कृषी महाविद्यालयात लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा येथे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत दिनांक 23 जुलै रोजी लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शिंदे, ईतर मान्यवर प्राध्यापक आणि विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या हस्ते लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. लोकमान्य टिळक यांनी आपल्या देशावर दिडशे वर्षे राज्य करणाऱ्या इंग्रज सरकारविरोधात देशवासियांना एकजूट करण्याचे, स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी भारतीयांना प्रेरीत करण्याचे काम केले. स्वराज्य हा भारतीयांचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि त्यासाठी संघर्ष केला पाहिजे,या विचाराची ज्योत त्यांनी सर्वांच्या मनामध्ये पेटवली. भारतीय स्वातंत्रलढ्याची आग धगधगती राहील याची त्यांनी आपल्या जहाल भूमिकेद्वारे काळजी घेतली. देशाच्या स्वातंत्र्य करिता त्यांनी लोकचळवळ उभारली तसेच अनेक प्रसंगी कठोर तुरुंगवास देखील भोगला.लोकमान्य टिळक हे एक उत्कृष्ट संपादक तसेच संस्कृत, गणित, खगोलशास्त्र इत्यादी विषयांमधील मान्यताप्राप्त अभ्यासक पण होते. त्यांनी लिहिलेल्या ’गीतारहस्य’ या पुस्तकामध्ये भगवद्गीतेतील कर्मयोगाची समीक्षा मांडण्यात आलेली आहे. लोकमान्य टिळकांचे नेतृत्व आणि कोट्यवधी भारतवासियांच्या त्यागातून, संघर्षातून, बलिदानातून देशाला मिळालेले स्वातंत्र्य टिकवणं, देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता अबाधित राखणे, भारतीय लोकशाही आणि राज्यघटनेची मूल्ये समाजात खोलवर रुजवणे हेच, लोकमान्य टिळकांना खरे अभिवादन ठरणार आहे. सदरील अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सदरील कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. अजित कुरे, प्रा. विलास बोनगे, प्रा. अजिंक्य ढोरे, प्रा. किरण माळी, प्रा. संगण्णा कुंभार, प्रा. शिवानंद मिश्रा, प्रा. धीरेंद्र कुमार, डॉ. संतोष शेंडे, प्रा. सुकन्या जाधव, प्रा. कल्पना मिटकरी आणि अंतिम वर्षातील कृषीदुतांची विशेष उपस्थिती होती.
.png)
No comments:
Post a Comment