Hot Posts

6/recent/ticker-posts

बंधूभेटीच्या सोहळ्याने वैष्णव गहिवरले; पालख्यांचा पंढरपूर तालुक्यात प्रवेश

 बंधूभेटीच्या सोहळ्याने वैष्णव गहिवरले; पालख्यांचा पंढरपूर तालुक्यात प्रवेश 


पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- ठाकुरबुवांच्या समाधीजवळील तिसरे गोल रिंगण...तोंडलेबोंडलेमधील पुष्पवृष्टी...अन् सायंकाळी झालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपानदेव महाराज यांच्या बंधुभेटीचा सोहळ्याच्या आठवणी घेत माऊलींचा पालखी सोहळा रविवारी भंडीशेगावमधे मुक्कामी थांबला.

दरम्यान संत ज्ञानेश्वर आणि संत सोपानदेव यांच्या बंधुभेटीचा सोहळा पाहताना रस्त्याच्या दुतर्फा उभ्या भाविकांनी गहिवरल्या स्थितीत आणि पाणावलेल्या डोळ्यांच्या कडा पुसत 'पुंडलिका वरदे हरी विठ्ठल' असा गजर केला व दोन्ही दोन्ही पालख्यांचे दर्शन घेतले. रविवारी(ता.१४)वेळापूरमध्ये पहाटेची महापूजा सोहळाप्रमुख योगी निरंजननाथ यांनी केली.
उजाडण्यापूर्वीच सकाळी पावसाच्या सरी अंगावर झेलतच वारकरी आणि दिंड्यांनी वेळापूरचा तळ सोडला. टाळ मृदंगाचा गजर आणि हरिनामाचे गोडवे गात सोहळा मार्गक्रमण करीत होता. काकड्याचे अभंग आळवीत सोहळा पावणे नऊच्या सुमारास ठाकूरबुवांच्या समाधी मंदिराजवळ पोचला. येथे सोहळ्यातील तिसरे गोल रिंगण झाले. अश्वाने चार फेऱ्या‍ मारुन रिंगण पूर्ण करत सोहळ्यातील वाटचालीत रंगत आणली. रिंगणात सोहळाप्रमुख योगी निरंजननाथ, प्रमुख अॅड. राजेंद्र उमाप, विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, मानकरी ऊर्जितसिंह शितोळे सरकार, महादजी शितोळे सरकार, मालक राजाभाऊ आरफळकर, बाळासाहेब चोपदार, राजाभाऊ चोपदार, रामभाऊ चोपदार, उद्धव चोपदार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री राजेश टोपे, खासदार संजय जाधव आदी उपस्थित होते. रिंगणानंतरच्या उडीच्या कार्यक्रमाने रिंगणाची उत्साहात सांगता झाली.
सकाळी साडेनऊच्या सुमारास पालखीने रिंगणातून मार्गक्रमण सुरू केले. सोहळा दुपारी तोंडले गावात जेवणासाठी थांबला. तोंडलेमध्ये प्रवेश करताच ग्रामस्थांनी मुक्त हस्ते पालखीवर फुलांची पुष्पवृष्टी केली. तोंडलेमधून निघून माऊलींचा पालखी सोहळा सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास दसूर येथे थांबला. त्यानंतर थोड्या वेळातच संत सोपानदेव महाराजांचा पालखी रथ हरिनामाचा गजर करीत तेथे आला. तेथे दोन्ही बंधूंचे पालखी रथ शेजारी शेजारी उभे करण्यात आले. दोन्ही संस्थानच्या विश्वस्तांनी एकमेकांना नारळ प्रसाद दिला. हा सोहळा सुरू असताना उपस्थित भाविकांच्या मनात या भावडांचे पूर्वजीवन समोर आले. त्या काळात त्याचे झालेले हाल आठवले. आता दोन्ही भावंडे एकत्र भेटत असल्याचा सव्वा सातशे वर्षानंतर सोहळा पाहताना उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या.
सोपानदेव महाराजांच्या पालखी सोहळ्यातील भाविकांनी माऊलींच्या पादुकांचे तर माऊलींच्या सोहळ्यातील वारकऱ्यांनी संत सोपानदेवांच्या पादुकांचे दर्शन घेतले. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत सोपानदेव महाराजांसह अनेक पालख्यांनी आज पंढरपूर तालुक्यात प्रवेश केल्याने मोठ्या संख्येने वारकरी एकाच मार्गावर आले.

Reactions

Post a Comment

0 Comments