आमदार सुभाष देशमुख मंद्रूप एमआयडीसीसाठी पुन्हा प्रयत्नशील
उद्योगमंत्र्यांसोबत बैठकीचे आयोजन; विविध विषयांवर केली चर्चा
सोलापूर (कटूसत्य वृत्त ):- दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील एमआयडीसीसाठी आमदार देशमुख यांनी पुन्हा प्रयत्न सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आमदार सुभाष देशमुख यांच्या पुढाकाराने मुंबईत उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासमवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत औद्योगिक वसाहतीच्या विकासाबाबत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.
या बैठकीत एमआयडीसीचे इन्फ्रास्ट्रक्चर सुधारण्याबरोबरच नवे उद्योग स्थापन करण्यासाठी लागणारे अनुकूल वातावरण निर्मिती आणि रोजगार संधींमध्ये वाढ करण्याच्या उपाययोजनांवर चर्चा झाल्याचे आमदार देशमुख यांनी सांगितले.
मंद्रुप येथे एमआयडीसी होण्यासाठी आमदार देशमुख यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. वरिष्ठ स्तरावर सतत पाठपुरावाही केला जात आहे. मंद्रूप येथील जागा एमआयडीसींसाठी निश्चित करण्यात आली आहे. भूसंपादनाच्या दृष्टीने प्रस्ताव सांगली प्रादेशिक कार्यालयाने भूसंपादन विभागाच्या महाव्यवस्थापकांना पाठविला आहे. ही औद्योगिक वसाहत झाल्यास किमान एक हजार छोटे-मोठे उद्योग सुरू होऊन तरूणांच्या हाताला काम मिळणार आहे.
आर्थिक विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा
मंद्रुप येथे एमआयडीसी करण्यासाठी आपण प्रयत्नशिल आहोत. आजच्या बैठकीमुळे मंद्रूप येथील औद्योगिक वसाहतीस नवीन दिशा मिळून, आर्थिक विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे, असे आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment