येणाऱ्या काळात सोलापूर भाजपमुक्त होईल.-खासदार प्रणिती शिंदे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 18, 2024

येणाऱ्या काळात सोलापूर भाजपमुक्त होईल.-खासदार प्रणिती शिंदे

 येणाऱ्या काळात सोलापूर भाजपमुक्त होईल.-खासदार प्रणिती शिंदे


सोलापूर(कटूसत्य वृत्त):-लोकसभेच्या निवडणुकीत सोलापूर जिल्हा भाजपमुक्त केल्यानंतर महाविकास आघाडीचे पुढचे लक्ष्य विधानसभा आणि महापालिका राहणार आहे. त्यादृष्टीने हालचाली सुरु झाल्या आहेत. मविआच्या वरिष्ठ नेत्यांनी या निवडणुका एकत्रित लढण्याचा निर्धार केला आहे. एकीचे बळ कोणते फळ देते हे लोकसभा निवडणुकीत दिसून आले आहे. तीच एकी पुढच्या निवडणुकीत ठेवण्याचा निर्णय तीनही पक्षांनी घेतला आहे. लोकसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर सत्कार समारंभात वेळ न घालवता खासदार प्रणिती शिंदे यांनी कामाला सुरुवात केली आहे. 

शहरातील लोकांचे प्रश्न मांडले. खास करुन पाणीपुरवठ्याचा विषय त्यांनी लावून धरला. महापालिकेत काँग्रेसची सत्ता असताना दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत असे. गेल्या दहा वर्षांत पाण्याचे दिवस तरी वाढलेच, शिवाय काही भागाला घाण पाणी देऊन महापालिका आरोग्याचे नवे प्रश्न निर्माण करत आहे. भाजपच्याच काही माजी नगरसेवकांनी काही दिवसांपूर्वी महापालिकेत काळ्या पाण्याच्या बाटल्या आणल्या होत्या. व्याज लावून पाणीपट्टी आकारणारी महापालिका शहरातील लोकांना एका अर्थाने काळ्या पाण्याची शिक्षा देत आहे. 

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सहापैकी तीन विधानसभा मतदारसंघ सोलापूर शहरात आहेत. सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य तसेच सोलापूर दक्षिण असे ते मतदारसंघ आहेत. यापैकी दोन मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. तर सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून स्वतः प्रणिती शिंदे लागोपाठ तीनवेळा विधानसभेवर निवडून गेल्या आहेत. सोलापूर शहराचा मोठा भाग या तीनही मतदारसंघात येतो. या भागातील लोकांचे प्रश्न गेल्या दहा वर्षांत सुटलेले नाहीत. केंद्रात, राज्यात आणि महापालिकेत लोकांनी सत्ता दिली परंतु भाजपला महत्त्वाचे प्रश्न सोडवता आले नाहीत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भिजत पडला आहे. उजनी ते सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे काम वेळेत पूर्ण करता आले नाही. त्यामुळे साडे चारशे कोटींची योजना साडे आठशे कोटींवर गेली. स्मार्ट सिटीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला. ४६ प्रकल्पांपैकी एकही प्रकल्प लोकांना उपयोगी पडला नाही. शंभर कोटींचे रस्ते केले, मात्र ते लोकांच्या सोयीसाठी नसून भाजपचे

कंत्राटदार, कार्यकर्ते यांचे भरणपोषण करण्यासाठी करण्यात आले. शहरातील हे रस्ते अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहेत असे 'खास प्रमाणपत्र' सत्तेवर बसलेल्या भाजप आमदारांनीच एका जाहीर कार्यक्रमात दिले होते. इतकेच नव्हे तर अशा कामांची चौकशी करण्याचीही मागणी केली होती. मतदारसंघांत आघाडीला निवडून येण्याची संधी आहे. लोकसभेप्रमाणे तीनही पक्षात यशस्वी जागावाटप झाले तर भाजपला सत्तेतून पायउतार करणे अवघड नाही, अशक्य तर मुळीच नाही. लोकांना बदल हवा आहे. जनता भाजपच्या कारभाराला कंटाळली आहे. कपटी आणि सुडाचे राजकारण तसेच भ्रष्ट कारभार याचा लोकांनाही वीट आला आहे. 

 होम मैदान, रंगभवन प्लाझा, डिपार्टमेंटल गार्डन, किल्लाबाग, मॉडेल रोड, नाईट मार्केट यासारख्या अनेक 'स्मार्ट' प्रकल्पांवर झालेला कोट्यवधींचा खर्च वाया गेला आहे. हा सामान्य जनतेचा पैसा आहे. लोकांनी विश्वस्त पदावर बसवलेल्या भाजपनेच हा लोण्याचा गोळा गिळून टाकला आहे.या मूलभूत प्रश्नांची तड लावायची असेल तर विधानसभेत आणि महापालिकेत सत्ता परिवर्तन झाले पाहिजे.त्या दृष्टिकोनातून काँग्रेसने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील ३१ लोकसभा मतदारसंघांत मविआचे उमेदवार निवडून आले आहेत. 

 देश बदल रहा है असे सांगणारा भाजप आतून आणि बाहेरून पूर्णपणे बदलला आहे. हा बदल पक्षातील अनेकांना रुचलेला नाही. हीच निष्ठावान मंडळी आता भाजपला खडे बोल सुनावू लागली आहेत. पराभवाचे आत्मचिंतन करण्याऐवजी पराभव केलेल्यांची निंदानालस्ती करण्यातच भाजपची नेतेमंडळी मश्गुल आहेत. यामुळे जनमानसात बिघडलेली भाजपची प्रतिमा अधिक खराब होणार आहे. हे वातावरण येणाऱ्या निवडणुकीत मविआसाठी अधिक पोषक ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत मतदारांनी जसा धडा शिकवला तसा विधानसभा निवडणुकीतही सोलापूरची हीच जनता सत्ताभोगी भाजपला पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही.

सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाला मिळालेली मते, त्यांना भाजपतील अंतर्गत वादाचा झालेला फायदा लक्षात घेता येणाऱ्या निवडणुकीत भाजपची कसोटी लागणार आहे. विधानसभेला उमेदवार देताना पक्ष नेतृत्वाला विचार करावा लागेल. महापालिकेतही या भागातून निवडून येणाऱ्या भाजप नगरसेवकांची संख्या घटण्याची शक्यता आहे. सोलापूर दक्षिण मतदारसंघात काँग्रेस पक्षाने मताधिक्य मिळवले आहे. त्यामुळे इथेही मतदारांनी धोक्याची घंटा वाजवली आहे. गेल्यावेळी ग्रेस पास झालेल्यांना यावेळी उमेदवारी मिळाली भाजपच्या हाती नापासाचे प्रगतिपुस्तक मिळेल असे आता त्याच पक्षातील लोक उघडपणे बोलू लागले आहेत. युवराजांचे नेतृत्व पचनी पडले नाही त्यामुळे अनेकांनी राजकीय वाट बदलली आहे. याचा मोठा परिणाम महापालिका निवडणुकीत दिसेल. खासदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभेत तयार केलेला माहोल विधानसभा आणि महापालिका निवडणुकीपर्यंत कायम ठेवण्यात यश मिळवले तर येणाऱ्या काळात सोलापूर भाजपमुक्त होईल.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages