राजकारणाचा मुख्य केंद्रबिंदू यापुढच्या काळात युवक असणार
आत्मनिर्भरतेबरोबरच आत्मविश्वास तसेच बौद्धिक प्रतिभासंपन्नताही युवकांमध्ये आहे. सामाजिक मूल्यांची नि राजकारणाची चांगली जाण युवकांमध्ये असल्यानेच अत्यंत निर्भयपणे हे युवक अलीकडच्या काळात व्यक्त होताना दिसले आहेत. बार्शीच्या राजकारणासह राज्य आणि देशातील राजकारणाचा मुख्य केंद्रबिंदू यापुढच्या काळात युवक असणार यात शंका नाही. सत्ता हाती सोपविताना ती पुन्हा माघारी घेण्याची क्षमता अंगी असणाऱ्या युवकांना राजकारणाचे आकलन पूर्वीपेक्षा अधिक आहे असे मान्य करताना त्यांच्यातील अभ्यासूवृत्तीदेखील आपल्याला मान्यच करावी लागेल. मध्यंतरी लोकसभा निवडणुका झाल्या. धाराशिव, सोलापूर, माढा यासह राज्यातील लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांकडून भविष्यातील अपेक्षा थेटपणे समाजमाध्यमांवर तसेच प्रत्यक्ष भेटीवेळी या युवकांनी बोलून दाखविल्याचे अनेक ठिकाणी घडले. राजकारणाचे अचूक आकलन या युवक वर्गाला ज्याप्रकारे आहे, तद्वतच सामाजिक जबाबदारीची त्यांची जाणही विकसित होताना दिसते आहे. बार्शीच्या राजकारणात अनेकदा हा सामान्य युवकच निर्भयपणे समोर येताना दिसला. देशातील सत्ताधाऱ्यांना महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पराभव स्वीकारावा लागला, याचे कारण म्हणजे 'तुमच्या हाती सत्ता दिल्यानंतर सामान्य जनतेच्या हिताचे निर्णय, धोरणे यावर अधिक लक्ष केंद्रित करताना महागाईलाही नियंत्रित करण्याची जबाबदारी सत्ताधारी म्हणून तुमची आहे, पण तुम्ही त्यात कमी पडलात.' असे ठामपणे सांगणारा हाच युवक होता. स्वामी विवेकानंदांपासून ते आचार्य दादा धर्माधिकारी यांच्यापर्यंत अनेकांनी समाजमाध्यमांसह सर्वत्रच अतिशय निर्भयपणे व्यक्त होणाऱ्या युवकांना राजकारणाचे अचूक आकलन असल्याने सत्तेच्या चाव्या कोणाच्या आपसूकच हातात टेकवायच्या याचा निर्णय घेण्याइतपत आजचा युवक आता पोक्त झाला आहे. स्वसामर्थ्य नि स्वसमर्थन या गुणांमुळे पुढच्या काळात गल्लीपासून दिल्लीपर्यंत युवक हाच राजकारणाचा केंद्रबिंदू असणार आहे, हे निर्विवाद आहे. सत्ता कोणाकडेही असली तरी देश युवकांच्याच हातात आहे अशी आजची एकूण परिस्थिती आहे.
युवकशक्तीचे माहात्म्य समोर ठेवले आहे. देशाला महासत्ता बनविण्याची शक्ती युवकांमध्येच आहे, असे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनीही उल्लेखले होते. मागील काळातील काही निवडणुका पाहिल्या तर बहुतांश राजकारण्यांनी 'समाजमाध्यमा' च्या प्लॅटफॉर्मला प्राधान्य दिल्याचे सर्वांनीच पाहिले आहे. आजच्या घडीला राजकारणातही ती अनुभवयास मिळत आहे. समाजमाध्यमांवरील लोकसभा निवडणुकीसंदर्भात युवकांच्या प्रतिक्रिया, भावना पाहिल्यास त्या किती थेट आणि निर्भय होत्या हे सर्वांनीच पाहिले. भारताच्या सत्तेचा निर्णय देणाऱ्या २०१४ च्या निवडणुकीत सर्वात मोठी भूमिका युवक वर्गाची होती हे साऱ्या देशाने मान्य केले.
समाजमाध्यमे प्रौढांपेक्षा युवकांच्याच हाती आहेत अशी परिस्थिती आहे. याचा सारासार विचार केल्यास राजकारणासंबंधीचे भाष्य असो वा राजकारण्यांकडूनच्या अपेक्षा असो, यावर अतिशय निर्भयपणे हा युवक व्यक्त होताना दिसला आहे. येणाऱ्या काळात ज्या कोणत्या निवडणुका होतील त्यातही आता या युवक वर्गाचीच भूमिका महत्त्वाची असणार आहे.

No comments:
Post a Comment