काँग्रेस व महाविकास आघाडीतील गटबाजीला मूठमाती देण्याची गरज
सोलापूर(कटूसत्य वृत्त):-सोलापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे राम सातपुते यांचा पराभव करून महाविकास आघाडीच्या प्रणिती शिंदे यांनी विजय मिळविला. गेल्या दहा वर्षांत सोलापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसने मिळविलेला हा सर्वात मोठा विजय आहे. या लोकसभा मतदारसंघातील सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार असताना काँग्रेसने दिग्विजय मिळविला. आता कृतज्ञता मेळाव्यातून प्रणिती शिंदे मतदार, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधत असतानाही काही ठिकाणच्या मेळाव्यातून काँग्रेसमधील गटबाजीने पुन्हा डोके वर काढल्याचे दिसते. ही गटबाजी संपवली नाही तर विधानसभेला काँग्रेससमोर मोठे आव्हान उभे राहू शकते.
लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर प्रणिती शिंदे यांचा अक्कलकोट, मोहोळ आणि मंगळवेढा येथे कृतज्ञता मेळावा झाला. या मेळाव्याला कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. खरे तर विजयी मेळावा म्हणजे आगामी विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची ही तयारीच आहे. विस्कटलेली काँग्रेसची घडी बसविण्याचे काम प्रणिती यांनी पुन्हा नव्या जोमाने हाती घेतली आहे. मतदार, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनाही बदल अपेक्षित आहे. त्यामुळेच त्यांच्या पाठीशी ताकद उभी केली जात आहे. आक्रमक स्वभाव आणि कोणतेही प्रश्न सोडविण्याची धमक असल्यामुळे मतदार व नवे कार्यकर्ते त्यांच्या यंग ब्रिगेडशी जोडले जात आहेत. परंतु, काही नेतेमंडळी आपले जुनेपण सोडायला तयार नाहीत. सोलापूर लोकसभा मतदारसंघात समाविष्ट दक्षिण सोलापूर तालुका हा एकेकाळी काँग्रेसचा बाल्लेकिल्ला होता. दी. शि. कमळे गुरूजी, वि. गु. शिवदारे, आनंदराव देवकते आणि भीमराव पाटील - वडकबाळकर या दिवंगतांच्या काळातही काँग्रेसमध्ये मतभेद होते. परंतु, मनभेद कधीच पाहायला मिळाले नाहीत. पक्षाने दिलेल्या उमेदवाराला निवडून आणले जात. विधानसभा, लोकसभा, सहकारी संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर याच नेतेमंडळींचे वर्चस्व होते. निवडणुकीपुरते राजकारण नंतर समाजकारण ही त्यांची कार्यपध्दती होती. मात्र, त्यांच्या पश्चात गटबाजीने काँग्रेसचा बळी घेतला. लोकसभा, विधानसभा, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीवरील सत्ता गटबाजीने लयास गेली. यंदा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी प्रणिती शिंदे यांना मिळाली. त्यांच्या निवडणूक प्रचारातही ठिकठिकाणी गटबाजीचे प्रदर्शन पाहायला मिळत होते. परंतु, त्याकडे लक्ष न देता सर्वांना सोबत घेऊन प्रणिती शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीत 'एक नारी सबको भारी' हे विरोधकांना दाखवून दिले.
दक्षिण सोलापूर तालुक्याच्यावतीने प्रणिती शिंदे यांचा कृतज्ञता आणि विजयी मेळाव्याचे आयोजन काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांनी केले होते. त्यांनी मेळाव्याला कार्यकत्यांची मोठी गर्दी जमविली होती.आगामी निवडणुकीसाठी त्यांचे हे शक्तिप्रदर्शनच होते. हा मेळावा विजयाचा, आनंदाचा आणि आगामी निवडणुकांमध्ये पुन्हा विजय मिळविण्यासाठी संकल्प करण्याचा होता. परंतु, येथेही गटबाजीच पाहायला मिळाली. मेळाव्याच्या जाहिरातीमध्ये माजी आमदार दिलीप माने तसेच सुरेश हसापुरे यांचे फोटो वगळले होते. त्याला उत्तर म्हणून सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे, दिलीप माने आणि सुरेश हसापुरे यांचे फोटो असलेले भव्य फलक कार्यक्रमस्थळी दर्शनी भागात लावले होते. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात आमदारकीसाठी इच्छुक असलेल्यांमध्ये दिलीप माने, सुरेश हसापुरे, बाळासाहेब शेळके, बाबा मिस्त्री, अमर पाटील, महादेव कोगनुरे आदींचा समावेश आहे. परंतु, विधानसभेची राजकीय महत्त्वांकाक्षा ठेवलेले माने आणि हसापुरे हे दोघे एक कधी झाले याचीच कार्यक्रमस्थळी चर्चा ऐकायला मिळाली. 'विरोधात कितीही असू द्या,आपण दोघेच पुरे' ही राजकीय टिप्पणी समाजमाध्यमात व्हायरल झाल्यानंतर माने - हसापुरे यांची राजकीय जोडी विधानसभेला एक होणार का ? अशी चर्चा सुरू झाली आहे. प्रणिती शिंदे यांच्या लोकसभा निवडणूक प्रचाराची बहुतांश सूत्रे हसापुरे यांच्याकडेच होती. त्यामुळे त्यांचे पक्षांतर्गत विरोधक वाढणे स्वाभाविक आहे. सध्या ते शिंदे कुटुंबीयांचे निकटवर्तीय आणि विश्वासू म्हणून ओळखले जातात. महाविकास आघाडी एकसंध राहिली तर सोलापूर दक्षिणची जागा कोणाला सुटणार आणि उमेदवारी कोणाला मिळणार याची उत्सुकता लोकांमध्ये आहे.
प्रणिती शिंदे यांना सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसला पुनर्वैभव मिळवून द्यायचे आहे. त्यासाठीच त्यांना मतदारसंघातील जनतेने मोठ्या मताधिक्यांनी निवडून दिले. परंतु, त्यांनी जी खंत व्यक्त केली ती काँग्रेसमधील गटातटाच्या नेत्यांना आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे. 'मी खासदार म्हणून निवडून आले पण माझे नेतृत्व काहीजण मान्य करायला तयार नाहीत' हे त्यांचे सूचक विधान काँग्रेससह महाविकास आघाडीतील नेत्यांसाठी आहे. लोकसभा निवडणुकीत मिळविलेल्या विजयाचा माहोल टिकवून महाविकास आघाडीने विधानसभेची निवडणूक लढविली तर सोलापूर लोकसभा मतदारसंघात किमान तीनपेक्षा जास्त आमदार महाविकास आघाडीचे येऊ शकतात. त्यासाठी काँग्रेस व महाविकास आघाडीतील गटबाजीला मूठमाती देण्याची गरज आहे.
.jpg)
No comments:
Post a Comment