सातपुतेंना विजयी करा महायुतीचा धर्म पाळा - मा. आ.राजन पाटील
मोहोळ(कटूसत्य वृत्त):-तालुक्यातील दुष्काळ संपवण्यासाठी अनगरसह १० गावांची पाणी योजना, सीना, भीमा नदीवर बॅरेज बंधारे तसेच सीना भोगावती जोड कालवा व कृष्णा-भीमा स्थिरीकरण यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाजप सकारात्मक असल्याने आपल्या तालुक्यातील पाण्याचा प्रश्न यामुळे सुटणार असल्याने आपण महायुतीचा धर्म पाळत लोकसभेचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्याचे आवाहन माजी आमदार राजन पाटील यांनी केले. लोकसभा सोलापूर मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी, महिला पदाधिकारी व सर्व सेलचे कार्यकर्ते यांची शहर व तालुका विभागात महत्त्वाची बैठक राजन पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. याप्रसंगी आमदार यशवंत माने, युवा नेते अजिंक्यराणा पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, शहाजहान शेख यांच्यासह तालुक्यातील सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित होते. राजन पाटील म्हणाले की, मला उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर वावनकुळे यांचे फोन आले असून त्यांनी तालुक्यामध्ये मताधिक्यावावत वोलणे केले आहे. तरी लोकनेते परिवार नेहमीच महायुतीचा धर्म पाळणारा म्हणून ओळखला जातो. यापूर्वीही तत्कालीन खासदार रामदास आठवले यांना लोकप्रतिनिधींचा विरोध असतानाही उमेदवारी दिली गेली होती. तरीही मोहोळ विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य देण्याचे काम केले होते.. यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी लाटेतही आघाडीचा धर्म पाळत सुशीलकुमार शिंदे यांना आपण स्वाभिमानी मतदारांच्या वळावर मताधिक्य दिले होते. म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याने आपापल्या गावांमध्ये प्रयत्न करून भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना मताधिक्य देण्याचे काम करावे, असे आवाहनही यावेळी पाटील यांनी केले. विविध संस्थांचे यावेळी तालुक्यातील सरपंच, पदाधिकारी, पक्षाच्या विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते, नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. माउली जाधव यांनी केले तर आभार तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे यांनी मानले.
0 Comments