Ads

Ads Area

लिंगायत मतदार कोणाच्या पाठीशी?

 लिंगायत मतदार कोणाच्या पाठीशी?

भाजप काँग्रेस मध्ये तगडी फाइट 


सोलापूर(कटूसत्य वृत्त):-सोलापूर लोकसभा (Solapur Loksabha) मतदारसंघातून काँग्रेस पक्षाने सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपने त्यांच्या विरोधात माळशिरसचे आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांना मैदानात उतरवलंय. भाजप आमदारांनी सातपुतेंच्या विजयासाठी शेवटच्या बुथपर्यंत जोरदार फिल्डिंग लावली आहे. तर प्रणिती शिंदेंचा (Praniti Shinde) प्रचाराचा धडाकाही सुरूच आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole),  माजी मंत्री सतेज पाटिल, काँग्रेस नेते यांच्या प्रचार सभा सोलापुरात पार पडल्या आहेत. त्यामुळे सोलापुरात भाजपचे आमदार आणि ताकद जास्त असली तरी प्रणिती शिंदे चांगली टक्कर देऊ शकतात, असं गणित सध्या सोलापुरात तयार झालंय. जाणून घेऊया दोन्ही उमेदवारांच्या पथ्यावर पडणारे आणि विरोधात जाणारे मुद्दे कोणते?

सोलापुरात कोणाचे किती आमदार ?

सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यातील 5 मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. प्रणिती शिंदे स्वतः एकच महाविकास आघाडीच्या आमदार होत्या. त्याच लोकसभा निवडणुकीत मैदानात उतरल्या आहेत. समाधान अवताडे, विजयकुमार देशमुख,  सुभाष देशमुख,  सचिन कल्याणशेट्टी हे भाजपचे 4 आमदार राम सातपुतेंसाठी ताकद लावताना दिसत आहेत. याचा फायदा राम सातपुतेंना होऊ शकतो. 

तीन मतदारसंघात लिंगायत मतदारांची मोठी संख्या 

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील तीन विधानसभा मतदारसंघात लिंगायत मतदारांची संख्या फार मोठी आहे. दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर,  अक्कलकोट या तीन विधानसभा मतदारसंघात लिंगायत समाज बहुसंख्येने आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने लिंगायत धर्मगुरु जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे लिंगायत समाजाचे एक गठ्ठा मतदान भाजपला मिळालं होतं. मात्र यावेळी भाजपने जयसिद्धेश्वर महाराजांचे तिकिट कापल्याने लिंगायत समाज नाराज असल्याची चर्चा आहे. शिवाय माजी गृहमंत्री सुशीलकुमार कुमार शिंदे यांचे लिंगायत समाजाशी ऋणानुबंध आहेत. त्यामुळे प्रणिती शिंदे लिंगायत मत मिळवण्यात यशस्वी ठरू शकतात, असे बोलले जात आहे.

भगीरथ भालके, आडम मास्तर, मोहिते पाटलांचा प्रणिती शिंदेंना पाठिंबा 

धैर्यशील मोहिते पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील पुन्हा शरद पवारांसोबत गेल्याने सोलापूर जिल्ह्यातील समीकरण बदललं आहे.  भाजपचे सोलापूरचे उमेदवार राम सातपुते यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मोहिते पाटलांना मानणार वर्ग प्रणिती शिंदेंना साथ देऊ शकतो. पंढरपूरचे माजी आमदार स्व. भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांनी भेट घेऊन प्रणिती शिंदे यांना पाठींबा दिलाय. तर आडम मास्तरही शिंदेंच्या मदतीला धावले आहेत. याचा फायदा प्रणिती शिंदेंना होऊ शकतो.

धर्मराज काडादींनी भाजप विरोधात शड्डू ठोकला 

लिंगायत समाजाचा मानबिंदू मानल्या जाणाऱ्या सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडल्यानंतर सोलापुरात चांगलाच गदारोळ झालाय. चिमणीचा मुद्दा यंदा सोलापूर लोकसभा निवडणुकीत ऐरणीवर आलाय. या प्रश्नावर कारखान्याचे सर्वेसर्वा धर्मराज काडादी यांनी चिमणी पाडल्याचा बदला घेऊन भाजपला धडा शिकविण्याची हाक दिली आहे. भाजपला निवडणुकीत पाडा, असे आवाहन काडादी यांनी कारखान्याच्या 27 हजार सभासद शेतकऱ्यांना केलं आहे. धर्मराज कादडी यांच्या नेतृत्वाला लिंगायत समाजाची मान्यता आहे. त्यामुळे राम सातपुतेंना याचा मोठा फटका बसू शकतो.  

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close