Ads

Ads Area

सिंघम माजी आमदार रमेश कदम यांच्या रविवारच्या मेळाव्याकडे जिल्ह्याचे लक्ष

 सिंघम माजी आमदार रमेश कदम यांच्या रविवारच्या मेळाव्याकडे जिल्ह्याचे लक्ष

महाविकास आघाडीत जाणार ? की महायुती सोबत राहणार ? तर्क विर्तकांना उधाण

मेळाव्यात स्पष्ट करणार रमेश कदम आपली भूमिका


मोहोळ (कटूसत्य वृत्त):- सोलापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये समाविष्ट असलेल्या मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रमेश कदम यांनी लोकसभा निवडणुकीतील भूमिका ठरवण्यासाठी मोहोळ येथे २८ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले आहे. कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊनच या लोकसभा निवडणुकीतील भूमिका आपण ठरवणार असल्याची माहिती माजी आमदार रमेश कदम यांनी माध्यमांशी बोलताना यापूर्वीच दिली आहे. मोहोळ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानामध्ये हा मेळावा होणार असून यामध्ये रमेश कदम हे महाविकास आघाडीच्या उमेदवारासोबत राहणार की महायुतीसोबत जाणार याबाबत मोहोळ मतदार संघामधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

गत विधानसभा निवडणुक  जेलमध्ये असून देखील केवळ तीन दिवसाच्या प्रचाराच्या जोरावर कदम यांनी लढवली होती. तरीही त्यांना पंचवीस हजाराच्या जवळपास मतदान मिळाले होते. 

त्यामुळे हजारोंची गर्दी गोळा करणारे रमेश कदम नक्की कोणासोबत जाणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. सुरुवातीला ते शरदचंद्र पवार गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. त्यामुळे ते तुतारी सोबत म्हणजे महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यासोबत जाण्याची चर्चा होती. मात्र कदम यांनी वेट अँड वॉच भूमिका स्वीकारत आपला निर्णय राखून ठेवला होता. विधानसभा डोळ्यासमोर ठेवून संजय क्षीरसागर यांनी भाजपमधून काढता पाय घेत शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत तुतारी सोबत जाणे पसंत केले आहे त्यामुळे रमेश कदम यांचा पुढील निर्णय काय असणार याबाबत मोठी उत्सुकता असताना त्यांच्या होणाऱ्या रविवारच्या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


आठ महिन्यापूर्वी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या आर्थिक गुन्ह्याच्या जामीनावर सुटल्यानंतर ते मोहोळ मध्ये आले असता हजारो नागरिकांनी त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केलेले संपूर्ण राज्याने विविध प्रसारमाध्यमे आणि टीव्ही चॅनलच्या माध्यमातून बघितले होते. यापूर्वी ते जेलमध्ये असताना राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी भाजपचे उमेदवार प्रसाद लाड यांना मतदान करून राष्ट्रवादीच्या तंबूत त्यावेळी खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे आता ते भाजप उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या सोबत राहणार की काय अशीही चर्चा तालुक्याच्या वर्तुळात रंगत आहे.


काही दिवसापूर्वी एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना भेटून एमआयएम मधून निवडणूक लढवण्याबाबत चर्चा केली होती. त्यामुळे ते एम आय एम मधून लोकसभा लढवणार अशीही चर्चा आठवडाभर सोलापूर शहरात रंगली होती. मात्र रमेश कदम यांनी कोणतेही स्वरूपाची घाई न करता आपला निर्णय संयमी निर्णय क्षमतेने राखून ठेवला होता. सतत धक्का तंत्रासाठी प्रसिद्ध असलेल्या रमेश कदम यांचा सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रियतेचा प्रभाव किती आहे हे ते जामीनावर सुटलेल्या गर्दी नंतर सर्वांना जाणवला होता. विशेष म्हणजे त्यावेळी त्यांनी मोहोळ येथे घेतलेल्या सभेवर टीका टिपणी न करता विकासाच्या आणि सकारात्मक धोरणाच्या राजकारणाला प्राधान्य देत सर्वांची मने जिंकली होती.

 

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close