लोकसभा निवडणुका ७ टप्प्यांत, निकाल ४ जूनला, महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका
नवी दिल्ली (वृत्त सेवा):- देशभरातील जनता गेल्या काही दिवसांपासून वाट पाहत असलेल्या लोकसभा निवडणुकांची घोषणा अखेर झाली. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी १८ व्या लोकसभा निवडणुकांची घोषणा करत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
चुनाव का पर्व, देश का गर्व या घोषवाक्यासह यंदा लोकशाहीचा उत्सव म्हणजे लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम पार पडत आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची निवडणूक प्रक्रिया पार पडत असून ९७.८ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्याचं यावेळी मुख्य निवडणूक आयुक्तांनी म्हटलं. त्यामध्ये, १.८२ कोटी नवीन मतदार आहेत.
देशातील लोकसभेच्या ५४३ जागांसाठी सात टप्प्यांत मतदान होणार आहे. याआधीही २०१४ आणि २०१९ मध्ये सात टप्प्यांत मतदान झाले होते. तत्पूर्वी, निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर ज्ञानेश कुमार व सुखबीर सिंग संधू यांनी शुक्रवारी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासमवेत लोकसभा निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेतला होता. त्यानंतर, आज राजीव कुमार यांच्या नेतृत्वात पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली. त्यानुसार, ही निवडणूक ७ टप्प्यात होत असून २८ मार्च रोजी पहिलं नोटीफिकेश जारी होणार आहे. तर, १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात होईल. महाराष्ट्रात ५ व्या टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका; कोणत्या तारखेला कुठे मतदान? जाणून घ्या सर्व माहिती
लोकसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाने शनिवारी दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांची घोषणा केली.
निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं की, १६ जून २०२४ रोजी लोकसभेचा कार्यकाळ संपत आहे.
शिवाय देशात काही राज्यांमध्ये याच काळामध्ये विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे. तिथेही निवडणुका होणार आहेत.
१०.५ लाख पोलिंग बूथ असून ९७ कोटींपेक्षा जास्त मतदार आहे. देशातील भौगोलिक परिस्थिती निराळी आहे. तरीही विनासायास निवडणुका पार पाडण्याचा आयोगाचा अनुभव आहे. ५४ लाखांपेक्षा जास्त ईव्हीएम मशिन्सद्वारे लोकसभा निवडणुका संपन्न होणार असून दीड कोटी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत, असं मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितलं.
यावेळच्या लोकसभा निवडणुकीसाठी १.८२ कोटी नवमतदार आहेत
४८ हजार तृतीयपंथी मतदार
१०० वर्षांवरील मतदार २ लाख
४९.७ कोटी पुरुष मतदार
४७.१ कोटी महिला मतदार
१८ ते २१ वयोगटातील २१.५० कोटी मतदार
८२ लाख प्रौढ मतदार
महिला मतदारांची संख्या 12 राज्यात पुरुषांपेक्षा जास्त आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, मसल आणि मनी पॉवर रोखण्यासाठी आयोगाकडून कठोर पावलं उचलली गेली आहे. जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांना याबाबत सक्त सूचना केल्याचं त्यांनी सांगितलं. मागील विधानसभेच्या निवडणुकांमध्ये पैसा आणि बळाचा वापर झाल्याचं आमच्या निदर्शनास आलेलं आहे. त्यामुळे सगळ्या हिंसा आणि पैशांचा गैरवापर आम्ही होऊ देणार नाहीत.
'मिथ वर्सेस रियालिटी' अशी वेबसाईट निवडणूक आयोगाच्या वतीने लाँच करण्यात येणार आहे. निवडणुकीच्या काळात अफवा रोखण्यासाठी आयोगाने हा निर्णय घेतला आहे. वेबसाईटवर एका बाजूला अफवा आणि दुसऱ्या बाजूला वस्तुस्थिती दर्शवण्यात येणार आहे, असं मुख्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केलं.
543 लोकसभा मतदारसंघ
7 टप्यात निवडणुका होणार
पहिला टप्पा- 19 एप्रिल ला मतदान होईल
दुसरा टप्पा - 4 एप्रिल पासून अर्ज भरता येणार
26 एप्रिल 2024 ला मतदान होणार
तिसरा टप्पा -19 एप्रिल पासून अर्ज भरता येणार
चौथा टप्पा - 13 मे ला मतदान
पाचवा टप्पा - 20 मे ला मतदान होईल
सहावा टप्पा - 25 मे ला मतदान होणार
सातवा टप्पा - 1 जून ला मतदान होणार
महाराष्ट्रात 5 टप्यात मतदान होणार असून 4 जूनला मतमोजणी होणार आहे.
दरम्यान, देशभरातील निवडणुकांचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
देशात स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी सर्वोतोपरी काळजी घेण्यात आली आहे. देशातील ९७.८ कोटी मतदारांपैकी ४९.७ कोटी पुरुष तर ४७.१ कोटी महिला मतदानाचा हक्क बजावतील. तर, ४८ हजार तृतीयपंथी मतदान करतील. त्यासाठी, ५५ लाख ईव्हीएम मशिन मतदानासाठी सज्ज असल्याचंही कुमार यांनी सांगितलं.
हे आहेत आव्हान
मसल्स, मनी, मिस इन्फॉरमेशन आणि म या गोष्टींचं आपल्यापुढे आव्हान आहे. त्यावर, मात करण्यासाठीही निवडणूक आयोगाने यंत्रणा उभारली असल्याचं कुमार यांनी सांगितले. तसेच, हिंसामुक्त आणि गैरव्यवहारविरहीत निवडणुका राबवणं हे प्राधान्य असल्याचंही आयुक्तांनी स्पष्ट केलं.
सलग तिसऱ्यांदा निवडणूक जिंकून हॅट्ट्रिक करण्यासाठी भाजप रिंगणात उतरली आहे, तर विरोधी पक्ष एकजूट होऊन इंडिया आघाडीच्या माध्यमातून भाजपचा विजयी रथ रोखण्याचा प्रयत्न करणार आहेत. गत, २०१९ मध्ये भाजपने ३०३ जागा जिंकून इतिहास रचला होता. 'अब की बार, ३७० पार'चा नारा भाजपने दिला आहे. तर, एनडीएसह ४०० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. विरोधकांनीही भाजपाचा विजयी रथ रोखण्यासाठी इंडिया आघाडीची वज्रमूठ बांधली आहे. त्यामुळे, यंदाच्या निवडणुकीत मोठी रंगत पाहायला मिळणार आहे.
५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका
आंध्र प्रदेश, ओडिसा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या चार राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ जून महिन्यात संपत आहे. लोकसभा निवडणूक मे महिन्याच्या अखेरपर्यंत चालणार आहे. अशावेळी या राज्यांच्या निवडणुका लोकसभेबरोबरच उरकल्या जाण्याची शक्यता आहे. तसेच पाचवे राज्य म्हणजे जम्मू काश्मीर आहे. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षीच या राज्याती निवडणूक सप्टेंबर २०२४ पर्यंत घेण्याचे आदेश दिले होते. यामुळे या राज्याचाही समावेश होण्याची शक्यता आहे.

0 Comments