मोहोळ पाणीपुरवठा योजनेस मंजुरी - आमदार यशवंत माने
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- अनेक वर्षा पासून रेंगाळलेल्या व मोहोळ शहर वाशीयांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा 44 कोटी 68 लाख रुपयाच्या पाणीपुरवठा योजनेस अखेर मंजुरी मिळाली असून यामुळे शहराचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघाल्याची माहिती आमदार यशवंत माने यांनी दिली. मोहोळ शहरवासीयांना ही नववर्षाची भेटच म्हणावी लागेल. गेल्या अनेक वर्षा पासून मोहोळ शहरवासीयांना पिण्याच्या पाण्याची अडचण भासत होती. पावसाळ्यात ही शहरवासीयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. उन्हाळा सुरू झाला की शहराला पाणीपुरवठा करणारा आष्टे- कोळेगाव बंधारा कायम कोरडा पडत असायचा,
त्यामुळे शहराची भिस्त टॅंकरवरच असायची. ही अडचण ओळखून प्रत्येक प्रभागातील नगरसेवक आपापल्या प्रभागापुरता पाणीपुरवठा करायचा त्यामुळे पाण्यातही राजकारण व्हावयाचे. दरम्यान मोहोळ ग्रामपंचायत असताना अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पाणी पुरवठ्याच्या नावाखाली ग्रामपंचायतीची सत्ता भोगली, पण मूळ पाणी प्रश्न तसाच राहिला. मोहोळ ला पिण्याच्या पाण्याची अडचण असल्याने विविध विभागाचे शासकीय कर्मचारी मोहोळ मध्ये येत नव्हते, त्यात पोलिसांचे काम अत्यंत अडचणीचे होते.कर्तव्यावरून घरी आल्यावर त्यांना अगोदर घागर घेऊन पाण्यासाठी जावे लागत होते. मोहोळ शहरातून राष्ट्रीय महामार्ग, पालखी मार्ग, जिल्हा मार्ग मोठ्या प्रमाणातून गेल्याने शहराचे विस्तारीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे.
ही पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्यानंतर शहराला दररोज पाणीपुरवठा शक्य होणार आहे. माणसी सुमारे 135 लिटर पाणी धरून या योजनेचा प्रस्ताव मंजुर झाला आहे. आष्टी तलाव ते मोहोळ शहर हे सुमारे 25 किलोमीटरचे अंतर आहे. दरम्यान राष्ट्रवादी फुटी पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोहोळ शहराच्या पाणी प्रश्नाबाबत मुंबई येथील त्यांच्या दालनात बैठक आयोजित केली होती.त्या बैठकीत आमदार माने यांच्यासह प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, प्रदेश चिटणीस रमेश बारसकर ही उपस्थित होते. त्या वेळीही शहराच्या पाणी पुरवठ्याबाबत चर्चा झाली, मात्र ती चर्चा ही चर्चाच राहिली. तेव्हा पासून आमदार माने यांनी सतत पाठपुरावा करून अखेर नवीन वर्षात 3 जानेवारी रोजी पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली.
त्या साठी त्यांनी या योजनेस सहकार्य केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व संबंधित विभागाच्या मंत्र्याचे अभिनंदन केले आहे
लवकरच 120 कोटीच्या भूमिगत गटार योजनेची मंजुरी मिळणार असल्याचे आमदार माने यांनी सांगितले. दरम्यान शहराचा पाणीपुरवठा प्रश्न निकाली निघाल्याने राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,' उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार यशवंत माने यांचे अभिनंदन केले. विकासात आम्ही राजकारण करत नाही राजकारणापेक्षा शहराचा पाणी प्रश्न महत्त्वाचा होता तो निकाली निघाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश काळे यांनीही तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे शहराच्या पाणीपुरवठया साठी प्रयत्न केले होते.

0 Comments