चिंतन आणि समाज सुधारणा हाच पत्रकारितेचा उद्देश !
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे प्रतिपादन
श्रमिक पत्रकार संघातर्फे पत्रकारांचा गौरव
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूरला उज्वल पत्रकारितेची परंपरा आहे. बातमीतून चिंतन व्हावे आणि त्या चिंतनातून समाजसुधारणा व्हावी हाच पत्रकारितेचा खरा उद्देश आहे असे सांगतानाच देश कुठे चालला आहे ? याचा विचार आता पत्रकार व राजकारण्यांनी करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी येथे केले.
सोलापूर श्रमिक संघाच्या वतीने सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पत्रकार संघाच्या माजी अध्यक्षांचा गौरव आणि पत्रकार दिनानिमित्त पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा सन्मान समारंभ शिवस्मारक सभागृहात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विचारमंचावर धर्मादाय उपायुक्त सुनिता कंकणवाडी, माजी महापौर महेश कोठे, जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे , माजी नगरसेवक प्रथमेश कोठे, पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
सुशीलकुमार शिंदे पुढे म्हणाले, पत्रकार हा समाज घडवण्याचे काम करतो. वास्तव चित्र समाजासमोर मांडतो. जुन्या - ज्येष्ठ पत्रकारांनी शोध पत्रकारिता चांगल्या प्रकारे केली. पूर्वी माहिती मिळवण्यासाठी धडपड करावी लागत होती. आज ती तंत्रज्ञानामुळे तत्काळ उपलब्ध होते. नुसतीच बातमी न देता शोध पत्रकारिता ही समाज हितासाठी गरजेचे आहे. बातमी किती वाईट आणि चांगली याचा विचार केला पाहिजे. बातमीतून चिंतन झाले पाहिजे. स्पॉन्सर बातम्या दिल्या जात आहेत, ही चिंताजनक बाब आहे. पण त्यातून बदनामी आणि एखाद्याचा आयुष्य उध्वस्त होऊ शकते, याचा विचार झाला पाहिजे. सध्या देश कुठे चालला आहे ? याचे चिंतन होणे गरजेचे आहे. पत्रकार आणि राजकारण्यांनी याबाबत विचार करण्याची गरज आहे. देश घडविण्याची प्रक्रिया होत नाही, तोपर्यंत देश पुढे जाऊ शकत नाही, असेही शिंदे म्हणाले.
यावेळी माजी महापौर कोठे म्हणाले, स्मार्ट सिटी कशी होणार असा सवाल उपस्थित करत नगरसेवकांनीच कामे घेतली. अधिकाऱ्यांना बोगस बिले करायला लावली. दिशाभूल करण्यात आली असा आरोप करतानाच देशात लोकशाही जिवंत राहते की नाही अशी भीती निर्माण झाली आहे. कायद्याची पायमल्ली होत आहे. अधिकारी राजीनामे देत आहे. सद्यस्थितीविरुद्ध पत्रकारांनी आवाज उठवला पाहिजे. जे खरं आहे तेच वास्तव लोकांसमोर मांडले पाहिजे, अशी अपेक्षा महेश कोठे यांनी यावेळी व्यक्त केली.
जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांनी पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांची माहिती दिली. याप्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात माजी अध्यक्ष अभय दिवाणजी, एजाजहुसेन मुजावर यांनी आपले विचार व्यक्त केले. प्रास्ताविक भाषणात संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी संघाच्या विविध उपक्रमांचा आढावा मांडला.
प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन तसेच सुवर्ण महोत्सवा निमित्त श्रमिक पत्रकार संघाच्या लोगोचे अनावरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कै. धोंडोपंत देशपांडे यांच्या स्मृत्यर्थ सोलापूर विद्यापीठाच्या एम. ए. मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझम मध्ये प्रथम आलेल्या रुबीना मुलाणी यांचा रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. बी. व्होक मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझम मध्ये प्रथम आलेल्या विजयकुमार पारसेकर , उल्लेखनीय सामाजिक कार्य करणारे वीरेंद्र हिंगमिरे आदींचा यावेळी सन्मान करण्यात आला. स्वागत खजिनदार विनोद कामतकर यांनी केले. सूत्रसंचालन ऐश्वर्या हिबारे यांनी केले तर उपाध्यक्ष विजय गायकवाड यांनी आभार मानले.
महेश कोठे हे कुठेही असो,
आम्ही वेगळे नाहीत : शिंदें
महेश कोठे हे माझ्या मित्रांचे चिरंजीव आहेत. ते कुठेही असो आम्ही वेगळे नाहीत. याचा मला विश्वास आहे म्हणून त्यांना कुठे जातो हे कधी विचारले नाही. उमेदीचा काळ असतो. संघर्षाचा काळ असतो. आम्ही साने गुरुजींचा मार्ग स्वीकारला. शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म याचा विचार आवश्यक आहे असे सांगतानाच देशाला पुढे नेण्यासाठी लॉन्ग टर्म राजकारणाचा विचार करण्याची गरज आहे. चिंतन महत्त्वाचे आहे. समाजात सतत चिंतन करणे गरजेचे आहे, असेही सुशीलकुमार शिंदे म्हणाले.
आयटी पार्कचे काम आठ
दिवसात सुरू होणार : कोठे
सोलापुरात आयटी पार्कचे भूमिपूजन करण्यात आले. याचे काम येत्या आठ दिवसात सुरू करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या कंपनीच्या प्रकल्पाचेही भूमिपूजन लवकरच करण्यात येणार आहे. आयटी पार्कच्या कामाला उशीर का झाला ? याचे कारण योग्य वेळी सांगणार असल्याचे माजी महापौर महेश कोठे यांनी स्पष्ट केले.
पत्रकारितेचा समाज मनावर मोठा
प्रभाव : धर्मादाय उपायुक्त कंकणवाडी
वृत्तपत्र व पत्रकारितेचा समाज मनावर मोठा प्रभाव असतो. वृत्तपत्रातील बातम्या व मजकुरांमुळे लोकांची लाईफस्टाईलही बदलू शकते. परखड आणि समाजाला तारणारी पत्रकारिता आवश्यक आहे. समाजाचा यावर मोठा विश्वास आहे. पत्रकारांनी परखडपणे बातम्या मांडणी केली पाहिजे अन्यथा लोकांचा भ्रमनिरास होऊ शकतो, असे धर्मादाय उपायुक्त कंकणवाडी म्हणाल्या.
या माजी अध्यक्षांचा झाला सन्मान;-श्रमिक पत्रकार संघाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त संघाच्या माजी अध्यक्षांचा सन्मानचिन्ह, शाल, सोलापुरी चादर - टॉवेल देऊन गौरव करण्यात आला. यावेळी नारायण कारंजकर, चंद्रशेखर कव्हेकर, हेमंत चौधरी, अविनाश कुलकर्णी, शंकर जाधव, एजाजहुसेन मुजावर, दशरथ वडतिले, अभय दिवाणजी, प्रशांत जोशी, प्रशांत माने, मनोज व्हटकर आदींचा सत्कार करण्यात आला.

0 Comments