मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी 100 टक्के भूसंपादन
मुंबई(कटूसत्य वृत्त):- केंद्र आणि राज्य सरकारचा महत्त्वाकाक्षी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी १०० टक्के भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली संपूर्ण 1389.49 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एन.एच.एस.आर.सी.एल) ने सांगितले की, मुंबई-अहमदाबाद रेल्वे कॉरिडॉरसाठी 100 टक्के भूसंपादन पूर्ण केले आहे. ही बुलेट ट्रेन गुजरात, महाराष्ट्र आणि दादरा आणि नगर हवेलीतून धावणार आहे. या प्रकल्पातील 120.4 किमी गर्डर्स लाँच करण्यात आले आहेत आणि 271 किमी पिअर कास्टिंग पूर्ण झाले आहे. गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील जरोली गावाजवळ 350 मीटर लांब आणि 12.6 मीटर व्यासाचा पहिला बोगदा अवघ्या 10 महिन्यांत पूर्ण करून एक उल्लेखनीय टप्पा गाठला आहे. तसेच 28 पैकी 16 पूल निर्मितीच्या विविध टप्प्यात आहेत.
यातील सहा नद्यांवर पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे, असे त्यात म्हटले आहे. महाराष्ट्रातील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स आणि शिळफाटा दरम्यानच्या 21 कि.मी. लांबीच्या बोगद्याचा एक भाग असलेल्या देशातील पहिल्या 7 कि.मी.च्या समुद्राखालील रेल्वे बोगद्यासाठी काम सुरू झाले आहे. याशिवाय मुंबई एच.एस.आर. स्टेशनच्या बांधकामासाठी खोदकाम सुरू झाले असल्याचे त्यात म्हटले आहे. दरम्यान, या प्रकल्पाला जायका कंपनीकडून 88,000 कोटी रुपयांचे सॉफ्ट लोन दिले आहे. हा प्रकल्प 1.10 लाख कोटी रुपयांचा असून 2022 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु भूसंपादनात अडथळे आल्याने प्रकल्पाला विलंब होत आहे.
बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा 2026 पर्यंत दक्षिण गुजरातमधील सूरत ते बिलीमोरा दरम्यान चालवण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे.
.jpg)
0 Comments