पंढरपूरच्या श्रीकांत शिंदे यांची राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी निवड
अजितदादांनी दिली पंढरपूरच्या समर्थकावर मोठी जबाबदारी
पंढरपूर(कटूसत्य वृत्त):- पंढरपूरच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व इतर सर्वच कार्यात नेहमीच चर्चेत असणारे राष्ट्रवादीचे श्रीकांत शिंदे यांची राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पक्ष (अजित पवार गट) प्रदेश सरचिटणीस पदावर निवड करण्यात आली असून सदरच्या निवडीचे पत्र राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्याहस्ते देण्यात आले.श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता ते प्रदेश सचिव अशी मजल मारली. त्यांनी नेहमीच सर्वसामान्य नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने अनेक समस्यांना वाचा फोडलेल्या आहेत व त्या पुर्णत्वास नेलेल्या आहेत. भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी नेहमीच त्यांनी आंदोलन केलेले आहे. वेगळ्या पध्दतीने आंदोलन करत ते नेहमीच चर्चेत असतात. सोशल मिडीयावर देखील ते अजित पवार गटाच्या भूमिका आक्रमकपणे मांडत असतात. विशेष म्हणजे अजित पवार यांनी महायुतीसह जाण्याच्या निर्णयाचे श्रीकांत शिंदे यांनी उघडपणे समर्थन केले होते त्यामुळे त्यांच्यावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून बडतर्फीची कारवाई करण्यात आली होती मात्र तरीही ते मागे हटले नाहीत त्यांनी आपले कार्य असेच सुरू ठेवले. त्यामुळेच त्यांनी आजपर्यंत केलेल्या कार्याची दखल घेवून त्यांच्यावर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खा.सुनिल तटकरे यांनी मोठी जबाबदारी सोपवलेली आहे. शारदाई पुरस्काराच्या माध्यमातून अनेक आदर्श मातांना पुरस्कार देवून ते गौरवित असतात. तसेच अनवाणी फिरणाऱ्या पुरूष, महिला यांना चप्पल वाटप, गरीब व गरजू मुलींना सायकल वाटप असे सामाजिक उपक्रम त्यांचे नेहमीच सुरू असतात. म्हणूनच त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेवून त्यांच्यावर महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
0 Comments