ग्रंथालय संचालक दत्तात्रेय क्षीरसागर यांच्या समर्थनार्थ
सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने बुधवारी धरणे आंदोलन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- ग्रंथालय संचालक दत्तात्रेय क्षीरसागर यांच्यावरील अन्याय दूर करावा त्यांना संचालक या पूर्वपदावर पदावर नियुक्त करण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने बुधवार दि. 27 डिसेंबर 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघाचे उपाध्यक्ष पांडुरंग सुरवसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याबाबत सविस्तर माहीती देताना सुरवसे म्हणाले की, ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, मुंबई चे दत्तात्रेय क्षीरसागर यांच्या विषयी विधान परीषद सभागृहातील झालेल्या लक्षवेधी मध्ये केलेले आरोप हे विधान परीषद सदस्य यांना माहीती देणाऱ्याने चुकीची व दिशाभूल करणारी माहीती पुरवल्याने सदस्यांनी मांडले आहेत. सोलापूर जिल्हयात नियोजन खात्यामार्फत नाविन्यपुर्ण योजनेतुन ८३३ शासनमान्य सार्वजनिक वाचनालयांना रुपये २, ४९,९०,०००/- चे ग्रंथवाटप करण्यात आले. हे तत्कालीन पालकमंत्रयाच्या निधीतुन, त्यांच्या आदेशान्वे, त्यांच्या मंजुरीने आणि सोलापूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी, नियोजन अधिकारी या सर्वाच्या नियोजनातुन त्यांनी जिल्हा ग्रंथालय अधिकारी सोलापूर यांचे नावे १ ते ५४ ग्रंथाच्या यादीवर स्वाक्षरी करुन नाविन्यपूर्ण योजनेमधुन काम करण्यास आदेशीत केले. त्यानुसार ग्रंथखरेदी आणि वाटप झालेले आहे. या बाबतची परिपत्रके, कागदपत्रे आम्ही संबंधित सदस्य, मंत्री व सभागृहास सादर करणार आहोत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याकडुन नियुक्त झालेले दत्तात्रेय क्षीरसागर यांना अर्जीत रजेवर पाठवून प्रभारी ग्रंथालय संचालक म्हणून अशोक गाडेकर यांची नियुक्ती केली आहे. अशोक गाडेकर हे ग्रंथालय संचालक या पदास पात्र असले तरी दत्तात्रेय क्षीरसागर यांचेवरती अन्याय झालेला आहे. अशोक गाडेकर यांची नियुक्ती करण्याअगोदर राजेंद्र कोरे यांची नियक्ती केली होती ही नियुक्ती करताना राजेंद्र कोरे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी, रत्नागिरी म्हणुन आदेशात उल्लेख होता. त्या नंतर दुसऱ्या दिवशी सुधारीत आदेश काढला आणि कोरे यांचा आदेश रदद केला. त्याची प्रत कोरे यांना देताना राजेंद्र कोरे, तांत्रिक सहाय्यक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती ग्रंथालय, दापोली जिल्हा रत्नागिरी असा हुददा घातला आहे. याचा अर्थ स्पष्ट होतो की राजेंद्र कोरे यांना ग्रंथालय संचालक पदी बसण्याची होत असलेली घाई लक्षात येते. राजेंद्र कोरे यांनी मंत्री महोदयांची दिशाभुल करुन माहीती दिली. स्वतःचे पद क्लास-२ की क्लास-३, नियुक्ती रत्नागिरी की दापोली हे सुध्दा खरे सांगितले नाही. राजेंद्र कोरे यांनी दत्तात्रेय क्षीरसागर ग्रंथालय संचालक झाले पासून नियोजन बध्दरितीने दत्तात्रेय क्षीरसागर यांचे पद घालवून स्वतःस मिळवायचे या एकमेव उद्देशाने पैशाच्या जोरावर काही राजकारण्यांची दिशाभूल करुन त्याच्या सहकार्याने अहंकाराच्या जोरावर हे कृत्य व्देषपूर्ण भावनेने केलेले आहे. राजेंद्र कोरे यांनी या अगोदर चंद्रपूर, यवतमाळ अथवा असतील तेथे केलेली ग्रंथखरेदी असे उपदव्याप करुन अमाप संपत्ती गोळा केली आहे असे समजते. या करीता त्यांचे फोन कॉल्सची, कोणताही पुरावा न देता दोन कर्मचाऱ्यामधील ठरवून केलेल्या संभाषणाची वैयक्तीक रेकॉरडिंगची, संपत्तीची, चौकशी होणे गरजेचे आहे.
राजेंद्र कोरे यांनी काही लोकांना हाताशी धरुन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, सोलापूर यांचेकडे माहितीचा अधिकार अर्ज सादर करुन मागील जुनी माहिती मागवुन, पाठपुरावा करत कार्यालयास हैराण करुन सोडले आहे. अशा भुरट्या कार्यकर्त्यांचा बंदोबस्त होणे आवश्यक असल्याचे सुरवसे यांनी सांगितले. दत्तात्रेय क्षीरसागर यांनी ग्रंथालय संचालक झाल्यापासून शाळा दत्तक योजना, LGMS प्रणाली व्दारे अनुदान वितरण, ग्रंथालय कायद्यात सुधारणा, नवीन वाचनालय मान्यता व दर्जाबदलसाठी निकष बदल, ग्रंथालय सर्वकश मार्गदर्शक ग्रंथनिर्मितीसाठी अभ्यास गट मंडळाची नियुक्ती, बदल्या करणे, ग्रंथपालन अभ्यासक्रम सुधारणा, बालकुमार ज्ञान कोपरा, तालुका ठिकाणी ग्रंथविक्री दालन, सदस्य वाढ अभियान अशी अनेक ग्रंथालय हितार्थ कामे हाती घेऊन करीत होते त्यामुळे ग्रंथालय चळवळीत उस्ताहाचे वातावरण निर्माण झाले होते.
दत्तात्रेय क्षीरसागर यांच्या चौकशी साठी नियुक्त केलेल्या उच्चस्तरीय चौकशी समीतीस माहीती साठी आपण आपले पत्र दयावे आणि दत्तात्रेय क्षीरसागर यांच्या वरचा अन्याय दूर करण्यास मदत करावी. दत्तात्रेय क्षीरसागर यांनी जिल्हा ग्रंथालय अधिकारी, सोलापूर येथे चार वर्षे काम पाहीले आहे. दत्तात्रेय क्षीरसागर यांच्यावर अन्याय झालेला आहे. तो अन्याय दूर करावा आणि क्षीरसागर यांना संचालक या पूर्व पदावर नियुक्त करण्यात यावे या मागणीसाठी बुधवारी सोलापूर जिल्ह्यातील सर्व ग्रंथालये एक दिवस बंद ठेवून हे आंदोलन करण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाचे कार्यकर्ते, सेवक, ग्रंथ प्रेमी यांनी या धरणे आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन पांडुरंग सुरवसे यांनी यावेळी केले आहे.
या पत्रकार परिषदेत ग्रंथ मित्र कुंडलिक मोरे, जयंत आराध्ये, धोंडीबा बंडगर, सारिका माढीकर, प्रकाश शिंदे, वृषाली हजारे, दत्तात्रय मोरे, विनोद गायकवाड, साहेबराव शिंदे, नवनाथ ढोले आदी उपस्थित होते.
0 Comments