वंचित कामगार संघटनेच्या वतीने कामगारांचा आवाज बुलंद करण्यासाठी
4 डिसेंबरला एक दिवशीय लाक्षणिक उपोषण.....!
सुरज अरखराव यांची माहिती....!!
सोलापूर (कटूसत्य वृत्त): -सोलापूर जिल्हा हा संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. याच कामगारांचा आवाज बुलंद करण्यासाठी शासनाच्या विविध योजना आणि त्या योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्यामुळे सरकारला धारेवर धरण्यासाठी वंचित बहुजन माथाडी कामगार युनियनच्या वतीने 4 डिसेंबरला एकदिवशीय लाक्षणिक उपोषण जिल्हाधिकारी कार्यालय पुनम गट येथे सकाळी 11 ते 5 या वेळेत होणार असल्याची माहिती वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे जिल्हा सरचिटणीस सुरज अरखराव यांनी श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेत पुढे बोलताना अरखराव म्हणाले की, " शासनाच्या विविध योजना कामगारांपर्यंत पोहोचवण्यासाठी कामगारांना जागृत करण्यासाठी आणि योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी यासाठी युनियनच्या वतीने आम्ही उपोषणाचे पाऊल उचलले आहे.
आमच्या प्रमुख मागण्या: -
* महाराष्ट्र शासनाने कंत्राटी भरती रद्द जीआर असूनही महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार मंडळ सोलापूर कार्यालयातील कंत्राटी भरती तात्काळ रद्द करून कायमस्वरूपी पद भरण्यात यावेत. आणि मध्यानभोजन घोटाळा चौकशी, घरकुल योजना, शैक्षणिक योजना व विविध योजनेची अंमलबजावणी त्वरित आणि तत्पर करण्यात यावी.
* संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती संलग्न महाविद्यालय मधील सेट /नेट अपंगत्वाचे बोगस दाखले सादर करून 33 प्राध्यापकांनी बोगस नोकरी मिळवल्याचे उघडकीस आले आहे. महाराष्ट्रातील इतरही विद्यापीठात तसेच पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये सुद्धा अशाच प्रकारची बोगस प्राध्यापक भरती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी शासनाने या महाविद्यालयाची निवृत्त न्यायाधीशामार्फत समिती स्थापन करून चौकशी करावी.
* लाड- पागे समिती पूर्ववत करावी.
* सोलापूर महानगरपालिका आरोग्य खात्यातील 300 बदली कामगारांना कायम करण्यात यावे.
* जिल्हा परिषद नवीन भरती वेतन श्रेणी वर लागू करावी.
* विडी कामगार यांचे जन्मतारीख पुरावे नसल्यामुळे पीएफ पेंशन मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. ही अडचण दूर करावी.
* एमआयडीसी व इतर ठिकाणी कामगारांना किमान वेतन मिळत नसल्यामुळे कामगारांची होणारी उपासमार थांबवावी.
या आणि इतर कामगारांच्या मागण्या सरकार दरबारी पोहोचवण्यासाठी आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी संविधानिक मार्गाने वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल युनियन च्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण संघटित व संघटित क्षेत्रातील कामगारांच्या कल्याणासाठी करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी अरखराव यांनी दिली आहे. तरी या लाक्षणिक उपोषणास संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगार, कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. आपला हक्कासाठी वेळ काढून मोठ्या संख्येने उपस्थित व्हावे असे आवाहन वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन च्या वतीने करण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे विचार सोलापूर जिल्ह्यातील संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांपर्यंत पोहोचवण्यासाठीच हा लढा युनियनच्या माध्यमातून उभा केला असल्याचेही त्यांनी यावेळी शेवटी बोलताना सांगितले.
यावेळी वंचित बहुजन माथाडी संघटनेचे अध्यक्ष ज्योतिर्लिंग स्वामी यांनी उपोषणास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे. या पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल गायकवाड, शहराध्यक्ष प्रशांत गोणेवार, वंचित बहुजन युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग खांडेकर, आणि वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक बाबुराव सावंत आदी उपस्थित होते.
0 Comments