सोलापुरात 17 डिसेंबरला आदिशक्ती महिला संमेलन...!
जिल्ह्यातून तीन हजार महिला संमेलनाला उपस्थित राहणार....!!
ह.दे .प्रशालेच्या मैदानावर सकाळी 10
ते 4 या वेळेत मिळणार वैचारिक मेजवानी......!!!
सोलापूर( कटू सत्य वृत्त): -देशाच्या प्रगतीत महिलांचा सिंहाचा वाटा आहे. शिपाई पदावर काम करणाऱ्या महिलेपासून ते पायलट झालेल्या महिलेपर्यंत आजही अनेक महिला विविध समस्या आणि परंपरेत अडकलेल्या दिसतात. यासाठी महिला सबलीकरण आणि जागर निर्माण करण्यासाठी महिलांनी एकत्रित येऊन विचार करावा, मातृ शक्तीचा आदर करत एका विचाराने काम करता यावे. याच स्वच्छ आणि पारदर्शक विचारधारेतून सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 3000 महिलांचे आदिशक्ती महिला संमेलन रविवार दिनांक 17 डिसेंबर 2023 रोजी हरीभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणावर होत असल्याची माहिती जिल्हा संयोजिका अश्विनी चव्हाण ,गायत्री सुमंत, आणि देवयानी देशमुख यांनी श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
पुढे बोलताना अश्विनी चव्हाण म्हणाल्या, " सकाळी 10 ते सायंकाळी चार या वेळेत दोन सत्रामध्ये हे संमेलन होणार असून राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर भारतीय स्त्री शक्ती राष्ट्रीय संघटन प्रमुख माधुरी साकुळकर यांचे" सशक्त स्त्री सशक्त समाज" या विषयावर व्याख्यान होणार आहे. त्यानंतर महिलांची वर्तमान परिस्थिती समस्या आणि समाधान या विषयावर सखोल गटचर्चा होईल. संस्कृत भारतीच्या कोल्हापूर विभाग प्रमुख स्वाती देशपांडे यांच्या व्याख्यानाने संमेलनाचा समारोप होईल. "विकसनशील देशात स्त्रीचे स्थान "या विषयावर त्यांचे मार्गदर्शन होणार आहे.
गेल्या दोन महिन्यापासून या संमेलनाची तयारी करण्यात येत असून सध्या या संमेलनाची जय्यत तयारी करण्यात आली असून सोलापूर शहर जिल्ह्यातील महिलांनी या संमेलनाचा अवश्य लाभ घ्यावा. देशाच्या प्रगतीत महिलांचा सिंहाचा वाटा आहे. मार्गदर्शक दिशादर्शक विचार ऐकण्याची संधी या संमेलनातून महिलांना मिळणार आहे. अशी आदिशक्ती महिला संमेलने संपूर्ण देशभरात घेण्यात येत असल्याचे यावेळी अश्विनी चव्हाण यांनी सांगितले. या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे या संमेलनात सहभागी होणाऱ्या महिलांचे कपाळावर चंदन, अत्तर आणि गुलाबाच्या फुलांनी सर्व स्वागत होणार आहे.संमेलनात तज्ञांच्या व्याख्यानांसोबतच सांस्कृतिक कार्यक्रम, रांगोळ्या यांचं आकर्षण विशेष असणार आहे. अशाप्रकारे आदिशक्तीचा म्हणजेच स्त्रीशक्तीचा जागर या निमित्ताने सोलापूर हरीभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणावर दिवसभर होणार आहे. दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्राने प्रकाशित केलेले भारतीय स्त्री चिंतन आणि भूमिका हे पुस्तक प्रत्येक सहभागी-भगिनीस यावेळी सप्रेम भेट देण्यात येणार आहे.
या पत्रकार परिषदेस माहिती संयोजिका गायत्री सुमंत, जिल्हा संयोजिका अश्विनी चव्हाण, देवयानी देशमुख, निवेदिता काछवा, अपर्णा महाशब्दे- पाटील, गौरी अमडेकर, विद्या एकबोटे आधी उपस्थित होते.

0 Comments