कुरुल येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न
कुरूल (कटूसत्य वृत्त):- रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल कुरुल मध्ये सन.१९८९-९० मधील इ.दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या आनंदात व उत्साहात संपन्न झाला. दोस्ती मंगल कार्यालयात सहकुटुंब आयोजित केलेल्या स्नेह मेळाव्यास मार्गदर्शन करताना प्रा. राजेंद्रकुमार वाकळे म्हणाले की, धावपळ अन् धकाधकीने वैतागलेल्या माणसाला आपल्या मित्र-मैत्रिणी सोबतची क्षणभराची ही भेट नक्कीच पुढील जगण्यासाठीची ऊर्जा ठरेल. यावेळी झाडबुके महाविद्यालय बार्शीचे प्रा.अनिल गेळे ,प्रा.जाधव तसेच निवृत्त शिक्षक मारुती सपाटे माणिक काटकर शंकर रुपनवर तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी सहकुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा.मलिकार्जुन पाटील सर यांचे प्रास्ताविकानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व कर्मवीर भाऊराव पाटील-लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सर्व शिक्षक विद्यार्थी-विद्यार्थिनीना स्मृतीचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात सुग्रास भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर गप्पा टप्पा, हास्यविनोदाला उधाण आले होते. शेवटच्या सत्रामध्ये प्रा. अनिल गेळे यांनी जबाबदार पालक अन् संवेदनशील युवा पिढी याविषयी विचार व्यक्त केले.तसेच चि. समर्थ संतोष लिगाडे याने मनोगत व्यक्त केले.
यावेळी पोलीसातील कवी समाधान देशमुख यांनी जगण्याच्या आनंदाची प्रेरणा ठरणारी 'एनर्जी ' व ' एक तरी बहिण असावी' या दोन कविता सादर करत उपस्थितांच्या भावनेला हात घातला. प्रा. डॉ. वैशाली गरगडे यांच्या लक्षवेधी आभार प्रदर्शनानंतर प्रा.गेळे यांचे पसायदानाने स्नेहभेटीचा सोहळा संपन्न झाला.या आनंद सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रा.ज्ञानेश्वर जाधव यांनी केले .
0 Comments