फसवणुकीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या आरोपीस जामीन मंजूर
शिक्षेलाही स्थगिती आरोपीतर्फे ॲड. सुरज गायकवाड यांनी पाहिले काम
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- सोलापूर येथील आरोपी सचिन अण्णाप्पा गायकवाड यास फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये शिक्षा भोगत असताना सोलापूर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने अपिलांमध्ये जामीन मंजूर करत शिक्षेलाही स्थगिती दिली आहे.
याबाबत सविस्तर मिळालेली अधिक माहिती अशी की, मूळ आरोपी सचिन गायकवाड यास भादंवि कलम ४२० च्या एकूण ४ गुन्ह्यांमध्ये सोलापूर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. त्यामुळे आरोपी हा येरवडा येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. शिक्षा भोगत असतानाच आरोपीने चारही गुन्ह्यांमधील शिक्षेविरोधात सोलापूर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात ॲड. सुरज गायकवाड यांचेमार्फत एकूण ४ अपीले दाखल करून अपिलांसोबतच ४ जामीन अर्ज देखील दाखल केले होते. जामीन अर्जांना सरकार पक्षातर्फे विरोध करण्यात आला. तथापि जामीन अर्जांवर आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद व जामीन अर्जांसोबत दाखल केलेल्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याचा संदर्भ ग्राह्य धरत सोलापूर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपी/अपिलार्थी यास चारही अपिलांमध्ये काही अटी व शर्तींसह जामीन मंजूर केले, सोबतच चारही गुन्ह्यांच्या शिक्षेला स्थगितीही दिली आहे. आरोपी/अपिलार्थी तर्फे ॲड. सुरज गायकवाड यांनी तर सरकारतर्फे ॲड. देशपांडे यांनी काम पाहिले.
0 Comments