Hot Posts

6/recent/ticker-posts

स्वप्न सखीचे चांगले

 स्वप्न सखीचे चांगले



त्यात नाव लिलया कोरले
सखी झाली सुजय ची
प्रीतीतले तराणे सजले

सखेसोबती जोडले सारे
सुख सोबती बहरले
सासर माहेर जोडताना
फुलासारखी मोहरले !

         चेहर्‍यावरती सदैव चैतन्याचा ओलावा, मनात प्रेमभावना रूजवणारा अलबेला स्वभाव प्रत्येक सखीला आपलंस करून प्रिय ठरतो असाच स्वभाव या सखीचा म्हणजेच अनुराधाचा आहे. प्रेमभावनेत बेभानपणे फुलण्याचा, मनसोक्त हसण्याचा, मायेला ओलाव्यात बांधण्याचा, मनमोकळया दिलखुलास गप्पा मारण्याचा उत्साह या सखीमध्ये तुडुंब भरगच्च भरलेला आहे. गुलमोहराचे मुग्धशृंगार लावण्यचं जणू हिच्या स्वभावात भरलेले आहे. जुन्या विचारांची व मनात सलणार्‍या वेदनेची पानगळ करून नवीन विचारांची   पेरणी व सकस संस्कारांची पालवी मनात कशी रूजवावी हे या अणुकडून नक्कीच शिकायला मिळते. मैत्रिणींच्या घोळक्यात तर तिचे लावण्यवती रूप हस्याचा झरा चेहर्‍यावरच्या वैभवाने नेहमी प्रप्फुल्लीत करणारा असतो तिच्याकडे पाहून देहभान हरपून समोरचा तिच्यात अगदी तल्लीन होऊन तिच्या सहवासात मग्न होतो ,नवीन रुढी परंपरा जपता जपता आध्यात्मिक गुण हाही तिच्यात तेवढ्याच उत्कटतेने भरलेला आहे. 
हिचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील माहूरगडाच्या पायथ्याशी वसलेले पिंपळगाव या गावी झाला . वडिलांना तलाठी नोकरी असल्यामुळे मंगळवेढा या ठिकाणी त्यांची बदली झाली आणि त्यांचे कुटुंब मंगळवेढ्यात स्थायीक झाले.  पुढील शिक्षण अनुराधाला मंगळवेढयामध्ये घ्यावे लागले. शिक्षण घेत असतानाच अनुराधाचा विवाह वैभवसंपन्न नटलेल्या संतांच्या भूमीत जन्माला आलेल्या अ‍ॅड.सुजय लवटे यांच्याशी झाला व सौ. अनुराधा सुजय लवटे त्यांची सहचारिणी बनली.   अनुराधाच्या वडिलांचे स्वप्न होते की अनुराधाने वकिल बनावे हीच  इच्छा त्यांचे जावई अ‍ॅड.सुजय लवटे सर यांनी पुर्ण केले व वडिलांचा आनंद द्विगुणित झाला. लग्नानंतर ही अनुराधा शिक्षण घेत राहिली. यात तिला पतीची भक्कम साथ मिळत गेली आणि तिने अध्यापक महाविद्यालयीन पदवी पूर्ण करून  इंग्लिश स्कूल मंगळवेढा या शाळेत काही दिवस शिक्षणाची सेवा दिली. सर्व जबाबदारी सांभाळत मुलांना शिक्षणाचे संस्कार देत आदर्श पत्नीची भूमिका पार पाडत उत्तम गृहिणी बनली. मुलांना शिक्षणाचे धडे देण्यासाठी तिने तिच्या नोकरीचा त्याग केला आणि मातृधर्म स्विकारला. विश्व कल्याणाचा जेथे भाव असतो तेथे मातृत्वाचे अधिष्ठान असते हे सर्वश्रृत आहे. आई आणि मातृत्व धर्म या संकल्पनामध्ये साधर्म्य वाटत असले तरी खर्‍या मातृत्व धर्माची व्याप्ती खोली आणि उंची किती गहन आहे याचे मौलिक भावनिक वैचारिक दर्शन अनुराधाच्या सत्यरूपी संस्कारातून दिसून येते. पतीला संसारात आर्थिक मदत व्हावी आणि आपण काही तरी केले पाहिजे ही घालमेल मनाला स्वस्थ्य बसू देत नव्हती.
मुले शिक्षणाला बाहेर गेल्यानंतर तिने ऑनलाईन बिझनेस करू लागली. क्लास घेवू लागली आणि बचत गट ही चालवू लागली व पतीला खंबीरपणे संसारात साथ देवू लागली. संसारात आलेल्या चढ उतारांना दोन हात करत संघर्षाच्या मुळ उर्जास्त्रोतांचा वेध घेत स्वतः जळणारे व इतरांना उजळविणारे प्रतिरूप यातून जाणवते. स्वप्नांच्या मुग्ध कळयांना फुलवण्याचे काम अनुराधाने आपल्या संसारात आयुष्याच्या वाटेवरती हळुवारपणे श्रावणाच्या सरींप्रमाणे केले आहे. वेगवेगळया आर्ट कलेमध्येही तिने हिरीरीने भाग घेवून बक्षिसे प्राप्त केली आहेत. ती पाककला असो, गौरीगणपती डोकोरेशन असो, बागबगिचा डेकोरेशन असो, रांगोळी अशा अनेक कलेमध्ये प्राविण्य मिळवत बक्षिसे प्राप्त केली आहेत. निसर्गाच्या सानिध्यात राहता राहता वृक्ष वेली,फुलझाडे यांचे तिने मुलांप्रमाणेच संगोपन केले आहे पानाफुलांना सोबत घेऊन समाजातील प्रश्न व स्त्रीच्या मनातील होणारी घालमेल  व्यक्त करत आपल्या साहित्याची लेखनी सरसावत  त्यातून तिने भावनेला वाट करून लेखणीला पान्हा फोडला याचबरोबर तिला वाचन, लेखन याचीही आवड कॉलेज जीवनापासूनच आहे. तेव्हापासून ती साहित्याची सहप्रवाशी आहे.
लेखिका आणि कवयित्री तसेच शीघ्र कवयित्री, निवेदिका म्हणून ती ओळखली जाते. शब्दसुमने मंच मंगळवेढा व अक्षरगंध मंच या मंचने तिच्या साहित्याला व्यासपीठ उपलब्ध करून दिले तसेच दैनिक, साप्ताहिक, दिवाळी अंक अशा ठिकाणी तिचे साहित्य प्रकाशित झाले आहे. आकाशवाणी पुणे केंद्रावर अलक लेखन व चारोळी सादरीकरण झाले  तसेच तिने आकाशवाणी सोलापूर केंद्रावरही तिच्या स्वरचित कवितांचे सादरीकरण केले आहे. साहित्यामध्ये अनेक ऑनलाईन व ऑफलाईन बक्षिसे सध्या प्राप्त आहेत .  आणि तिचा कवितासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे.  लवकरच कविता संग्रह प्रकाशित होवो , अमृतांच्या अक्षरांची पालखी उत्तरोत्तर  बहरत जावो हीच सदिच्छा!
मोठा मुलगा आशुतोष वकिलीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेतो तर  मुलगी प्रांजल सी.ए.करते,आत्मिक शक्तीच्या जोरावर भौतिकच नव्हे तर सर्वांगीन सामाजिक प्रगती साधता येते यातून दिसून येते. अनु ने तहहयात हे स्त्रीत्व निभावले आहे याची रूजवण प्रत्येक स्त्री मध्ये व्हावी असे तिला प्रभावीपणे वाटते. जीवनातील हे सर्व श्रेय सासर, माहेर आणि तिचे पती यांना देते आणि शेवटी ती म्हणते  असाच पाठिंबा प्रत्येक स्त्री ला मिळाला तर ती नेहमीच खर्‍या स्त्रित्वाचा, मातृत्व धर्माचा अवलंब करून मानव जातीला समृद्ध करेल.
या वैविध्यपूर्ण विचाराने नटलेल्या या अनु ला एक उत्कृष्ठ आई, मुलगी, सून, बायको , बहिण,होण्याचा बहुमान मिळाला.  इतर समाजातील स्त्रियांनाही यातून तिने मोलाचा संदेश  यातून दिला. 
हिच्या मुखी नेहमीच अमृताची वाणी गच्च ओल्या भावनांनी भरलेली असते अशा माझ्या सखीस अनुराधास जन्म दिनाच्या मयुरपंखी शुभेच्छा!

तुझ्या वाढदिवसाचे सुखदः क्षण
सदैव तुला आनंदात ठेवो
अनमोल दिवसाच्या आठवणी
आनंदाच्या क्षणांना उजाळा देवो !

लेखन:
सौ. विद्या प्रकाश माने (कवयित्री, लेखिका,निवेदिका,गझलकारा) 
(एम. ए. मराठी) 
शब्द सुमने साहित्य मंच (सचिव)
मंगळवेढा
Reactions

Post a Comment

0 Comments