Hot Posts

6/recent/ticker-posts

बोगद्यात गाडली गेलेली संवेदनशीलता...

 बोगद्यात गाडली गेलेली संवेदनशीलता...


कटूसत्य वृत्त :- हिमालयातील बोगदा कोसळल्याने ४१ मजूर १२ दिवसांपासून अडकले आहेत. हे सर्व अर्थातच गरीब कुटुंबातील आहेत..


आपल्या पातळीवर आपण काहीच करू शकणार नाही हे जरी खरे असेल तरी आपल्याला फार फरक ही पडत नाहीये...

हे वाटण्याचे कारण २१ जुलै २००६ रोजी हरियाणात प्रिन्स नावाचा एक गरीब घरातील मुलगा बोअरवेल मधील खड्ड्यात पडला होता...तेव्हाचे देशाचे चित्र किती वेगळे होते...नुकतेच मोबाईल आले होते..
सगळीकडे प्रिन्स वाचणार की नाही याने देशात सगळे लोक नेते अभिनेते अतिशय अस्वस्थ झाले होते. मेसेज फिरत होते आणि प्रार्थना होत होत्या. अखेर ५० तासांनी तो ५ वर्षाचा प्रिन्स वाचला आणि देशभर आनंद व्यक्त झाला. ५० तास सगळे जण श्वास रोखून होते. कोणी तिथे मदतीला जाणार नव्हते पण तरीही केवळ संवेदनेच्या पातळीवर सर्वजण त्याला भावनेच्या पातळीवर जोडून होते...

या पार्श्वभूमीवर आज या ४१ कामगारांसाठी मीडिया, सोशल मीडिया इतकी सहज उपलब्ध असून देश म्हणून आपल्या काय संवेदना आहेत ?
देश सारा त्या बोगद्याशी जोडला जाण्याऐवजी स्टेडियम शी जोडला गेला होता. आमचे श्वास पूर्णपणे एका एका बॉलवर केंद्रित होते..४१ कामगारापेक्षा ५० षटके जीवन मरणाचा प्रश्न झाली होती..आणि हो दिवाळी साजरी होताना ' आमचा आनंद कुठेही विचलित झाला नाही,..

१७ वर्षात किती फरक पडलाय...प्रिन्स ते ४१ कामगार हे किती मोठे अंतर पडले आहे...ते जणू आमचे कोणीच नाहीत..
आम्ही तिथे जाऊ शकणार नाही किंवा गेलो तरी काहीच करू शकणार नाही पण त्या वेदनेशी
आम्ही देश म्हणून तादात्म्य नाही आहोत हे या १७ वर्षातील पडलेल्या अंतराने दाखवून दिले आहे.... आत्ममग्न मध्यमवर्ग वाढल्याचा हा अपरिहार्य परिणाम आहे का ?
मदतीचा उजेड बोगद्यात पोहोचत असला तरी
आमच्या संवेदनशीलतेच्या बोगद्यात मात्र गडद अंधार आहे....

Reactions

Post a Comment

0 Comments