"सुवर्णधन" दिवाळी अंकाचा थाटात व शानदार प्रकाशन सोहळा...!
सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- वाचक चळवळ सातत्याने समाज मनावर रुजविण्यासाठी ,' सुवर्णधन ' सारख्या दिवाळी अंकानं प्रकाशित होणं आवश्यक असल्याचे मत जिल्हा ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष ग्रंथमित्र कुंडलिक मोरे यांनी व्यक्त केले.
आवंतीनगर येथील श्रीकांत सार्वजनिक वाचनालयात झालेल्या "सुवर्णधन" या दिवाळी अंकाच्या शानदार प्रकाशन सोहळ्या प्रसंगी मोरे हे अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
पुढे बोलताना कुंडलिक मोरे म्हणाले, "सध्याच्या धकाधकीच्या युगात वाचक संख्या कमी होऊ लागल्यामुळे वाचकांची संख्या वाढविण्यासाठी ' सुवर्णधन ' हा निश्चितच महत्त्वाची भूमिका पार पाडेल यात शंका नाही. सध्याच्या मोबाईल आणि इंटरनेटच्या युगामध्ये वाचन करणाऱ्यांची संख्या थंडावल्यामुळे वाचक संख्या वाढवण्यासाठीच आम्ही सातत्याने प्रयत्न करत राहू अशी ग्वाही यावेळी शेवटी बोलताना मोरे यांनी दिली.
याप्रसंगी जिल्हा ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष तथा वृत्तदर्पण न्यूज चॅनलचे प्रमुख,दै.कटुसत्यचे संपादक पांडुरंग सुरवसे हे प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना म्हणाले,नावाप्रमाणेच ' सुवर्णधन ' हा दिवाळी विशेषांक निश्चितच वाचनीय आणि आकर्षक असल्यामुळे तो सर्व दूर पोहोचेल यात शंका नाही.
यावेळी कवी तथा प्रकाशक राजेंद्र भोसले आपले मत व्यक्त करताना म्हणाले की, ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा असून सध्या तरुणाई मध्ये वाचनाचे प्रमाण अतिशय कमी झालेले आहे. त्यामुळे विचारधनच्या माध्यमातून अशा तरुणाईला निश्चितच दिशा मिळेल. व वाचन संस्कृतीला चालना मिळेल. वाचाल तर वाचाल" या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या हाकेला आजचा तरुण योग्य प्रतिसाद दिल्याशिवाय आणि अशा प्रकारचे विशेषांक वाचल्याशिवाय तळागाळातील वाचक वाचन संस्कृतीमध्ये आल्याशिवाय वाचन संस्कृतीची उंची वाढणार नाही, त्यासाठीच सुवर्णधन संपादन समिती सातत्याने प्रयत्न करत असल्याचे यावेळी भोसले यांनी सांगितले.
प्रारंभी संपादिका प्रो.डाॅ.सुवर्णा गुंड-चव्हाण यांनी प्रास्ताविक व उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या परिचय करताना संस्थेचा उद्देश, दिवाळी अंकाचा उद्देश सांगितला. समाजाप्रती असणारी बांधीलकी लेखक संपादकांनी कशी जपायला हवी. याविषयी त्यांनी ओघवत्या शैलीत आपले विचार प्रकट केले.
यामध्ये लोकसाहित्यिकार तारा भवाळकर, प्रा.ललिता गादगे,दि.बा.पाटील , भैरवनाथ डवरी, रवी राजमाने, प्रो.डाॅ सुनील विभुते यांच्या कथा , अनिल लोहार यांची एकांकिका, कविता गोविंद काळे, डॉ रामचंद्र जाधव, अनिल सर्जे, इंद्रजित घुले,प्रा.शैलजा टिळे,राजन लाखे, रामप्रभू माने, डॉ. तेजस्विनी डांगे,अलका सपकाळ, प्रतिभा खैरनार, डॉ ललित अधाने, अशोक नीलकंठ. विविध विषयांला साद घालणा-या भावना व वैचारिक लेख असल्याने , पुरातत्वज्ज्ञ नितिन अनवेकर, संगितज्ज्ञ दिपक कलढोणे, अधिष्ठाता डॉ महेंद्र ठाकूर, बालसाहित्यकार एकनाथ आव्हाड, जलकन्या भक्ती जाधव, प्रसारमाध्यम विभाग प्रमुख डॉ रविंद्र चिंचोलकर, विज्ञानवादी फुला बागुल, ग्रंथमित्र कुंडलिक मोरे याचे लेख वाचकांच्या विचाराला दिवाळीच्या निमित्ताने बौद्धिक खुराक देतील असा विश्वास प्रो.डाॅ.सुवर्णा गुंड-चव्हाण यांनी व्यक्त केला.
यावेळी प्रकाशक प्राचार्य धनंजय चव्हाण, यांनी संस्थेच्या वाटचालीतून ध्येय धोरणे व्यक्त करताना अधिकाधिक लोकांना उपयुक्त असं नवविचारासह विचारधन देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.
यावेळी अनिल प्रिंटिंग प्रेसचे मालक अनिल बाकळे, जिल्हा ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष जयंत आराध्ये, परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक हरिभाऊ नरखेडकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्याधिकारी प्रताप यादव, संपादन समितीचे महेश रामशेट्टी, महिला व बालकल्याण विभागाच्या ताकभाते मॅडम, मोरे मॅडम, प्रियांका पिंपळकर,महेश रामशेट्टी स्नेहल पाटील, हिराचंद नेमचंदचे दत्ता मोरे सर,विशेष म्हणजे आवंतीनगर प्रभागाचे नगरसेवक किरण पवार आणि सौ.श्रद्धा किरण पवार आवर्जून उपस्थित राहून सुवर्णधन दिवाळी विशेषांकास सदिच्छा दिल्या.
रुपाली महेश रामशेट्टी यांनी अतिशय प्रभावी सूत्रसंचालन केले.
श्रीकांत सार्वजनिक वाचनालयाच्या संस्थापक अध्यक्षा प्रा.गुणमाला पाटील यांनी शेवटी सर्वांचे आभार व्यक्त केले.
0 Comments