लोकमंगल कृषि तंत्रनिकेतन मध्ये आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य
वर्षानिमित्त भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल कृषि तंत्रनिकेतन, वडाळा आयोजित आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ चे कार्यक्रम समन्वयक मा. डॉ. तानाजी वालकुंडे तसेच कडधान्य व तेलबिया पिके संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, पंढरपूरचे प्रभारी अधिकारी मा.डॉ. रमेश भदाणे उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष, लोकमंगल कृषि तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. डी. बी. शिंदे यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोस्तवाच्या निमित्त राबविण्यात येणारे योग्य आहार मोहिमेअंतर्गत आहार विषयक जनजागृती करणेबरोबरच विविध शासकीय योजनांचा फायदा घेऊन तृणधान्य पिकांचे उत्पादन व उत्पादकता वाढविणेसाठी उपस्थित सर्व शेतकरी बांधवांना आवाहन केले. तसेच भरड धान्य पौष्टिकतेच्या दृष्टीने समृद्ध असतात. भरडधान्य अंतर्गत ज्वारी, रागी, नाचनी, बाजरी, माडुंआ,कोडो, सावा इत्यादी पिके येतात. या पिकांमध्ये उच्च पौष्टिक मूल्य असल्यामुळे त्यांना पौष्टिक तृणधान्य (न्युट्री सिरीयल) म्हणूनही ओळखले जाते. या भरडधान्यावर प्रक्रिया करून कुकीज, पोहे, मॅगी नूडल्स इत्यादी पदार्थ बनविले जातात. बदलता जीवनक्रम व नव्या संस्कृतीमुळे रोजच्या आहारातून जाड्याभरड्या धान्यांचा वापर हळूहळू कमी होत आहे. ही कमतरता भरून काढण्यासाठी भारत सरकारच्या शिफारशीवरून संयुक्त राष्ट्राने 2023 हे वर्ष भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केले, अशी माहिती प्रमुख मार्गदर्शक डॉ. रमेश भदाणे यांनी दिली. यावेळी कृषि विज्ञान केंद्र, मोहोळचे कार्यक्रम समन्वयक डॉ. तानाजी वालकुंडे यांनी उपस्थित सर्व शेतकरी व विद्यार्थ्यांना मुरघास म्हणजे काय? मुरघास कसा तयार करावा व त्याचे जनावरांसाठी असलेले फायदे यावर सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. ज्योती गायकवाड यांनी केले. यावेळी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शिंदे, तसेच सर्व प्राध्यापक वर्ग, प्राध्यापकेतर कर्मचारी, शेतकरी बांधव, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
0 Comments