कुणबी हेच मराठा-भोसे येथे सापडले दाखले
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):-तालुक्यातील भोसे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या रेकॉर्डमध्ये सुमारे २५ लोकांचे कुणबी दाखले आढळून आले आहेत, तर दोन दाखले हे मोडी लिपीत सापडले आहेत. यावरून पश्चिम महाराष्ट्रातही कुणबी म्हणजेच मराठा असल्याचे स्पष्ट झाले आहे. मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी कुणबी हाच मराठा असल्याचे शासनाला कागदोपत्री दाखवून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. मात्र, कुणबी प्रमाणपत्र असल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण देता येत नाही, अशी सरकारची भूमिका होती. मात्र आता सोलापूर जिल्ह्यात सुद्धा कुणबी समाज असल्याची कागदपत्रे सापडायला सुरुवात झालेली आहे; ही मराठा समाजासाठी जमेची बाजू ठरू लागली आहे...
.सोलापूर जिल्ह्यातील अनेक प्राथमिक शाळांमधून कुणबी जातीच्या नोंदी आढळून येऊ लागल्या आहेत.. त्यामुळे मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, या मागणीला मोठी बळकटी मिळाली आहे. स्वराज्य पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. महादेव तळेकर, अजय जाधव, विकास गावंधरे यांनी प्राथमिक शाळेतील दाखले पाहिले असता ही बाब समोर आली. यावेळी बोलताना प्रा. महादेव तळेकर म्हणाले की, भोसे गावामध्ये कुणबी जातीच्या उल्लेखाबद्दल अनेक वेगवेगळ्या प्रकारचे दस्तावेज सापडलेले आहेत. १८६५ सालापासून लोकल बोर्डाच्या (सध्याच्या जिल्हा परिषद शाळेत) या नोंदी सापडल्या आहेत. मोडी लिपीमध्ये सुद्धा बऱ्याच जणांचे दाखले आहेत. त्यामध्ये कुणबी असा उल्लेख स्पष्टपणे लिहिलेला आहे. ज्या ठिकाणी धर्माचा उल्लेख नाही ,मात्र कुणबी उल्लेख आहे. सन १९०० ते १९१९ मधील काही दाखल्यांमध्ये कुणबी हा स्पष्ट उल्लेख या ठिकाणी आम्हाला आढळून आलेला आहे. पण ज्यांच्या पणजोबा, आजोबांच्या दाखल्यावर कुणबी आहे, त्यांच्या नातवंडांच्या नावापुढे मात्र मराठा असा उल्लेख आहे. अशा मराठा बांधवांनी कुणबी प्रमाणपत्र काढून घ्यावेत. दरम्यान, मनोज जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ भोसे येथे आमरण उपोषण करणारे नितीन तळेकर आणि चांगदेव तळेकर यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला मुस्लिम समाजाच्या वतीने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक शहाजहान शेख यांनी पाठिंबा दिला आहे. भोसे येथे कुणबी जातीचे पुरावे सापडल्याच्या आधारे, सोलापूर जिल्ह्यामध्ये शिंदे समिती पाठवून कागदपत्रांची पडताळणी केली जावी. अशी मागणी नितीन तळेकर यांनी यावेळी केली आहे.
0 Comments