होटगी (सावतखेड) ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचाराचा महापूर...!
भ्रष्ट अधिकारी आणि लोकप्रतिनिधीवर त्वरित कारवाई न झाल्यास 20
 ऑक्टोबर पासून आमरण उपोषण करण्याचा गंगाराम चौगुले यांचा
 इशारा...!!
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी (सावतखेड) ग्रामपंचायत भ्रष्टाचाराने माखली असून या ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी पॅनल प्रमुख ,ग्रामसेवक,  सरपंच ,उपसरपंच चांडाळ चौकडीने करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करून शासनाची फार मोठी फसवणूक केली आहे. या संदर्भात 31 सप्टेंबर 2023 ला तक्रार देऊन महिना झाला तरी कोणत्याही भ्रष्ट अधिकाऱ्याची चौकशी अद्याप झालेली नाही. त्यामुळे या महा भ्रष्टाचाराची पोलखोल करण्याचा विडा होटगी  येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दक्षिण सोलापूर तालुक्याचे समन्वयक गंगाराम चौगुले यांनी उचलला आहे.
या महा भ्रष्टाचारा च्या संदर्भात सविस्तर माहिती देताना गंगाराम चौगुले म्हणाले की, "ना खाऊंगा ना खाने दूंगा" असा आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला असला तरी देशातील प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेत आणि कार्यालयात टेबलाखालून मलिदा दिल्याशिवाय कामे होत नाहीत. असाच करोडो रुपयाचा भ्रष्टाचार दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी (सावतखेड)  ग्रामपंचायती च्या ग्रामसेवक,  सरपंच,  उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य,  आणि पॅनल प्रमुखांनी आपण सारे भाऊ मिळून गोळा खाऊ याप्रमाणे करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केला असून या संदर्भात 31 सप्टेंबर 2023 रोजी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन एक महिना पूर्ण झाला तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची चौकशी करण्यात आली नसून भ्रष्ट अधिकाऱ्यांना आणि लोकप्रतिनिधींना वाऱ्यावर सोडल्यामुळे एक प्रकारे भ्रष्टाचाराला या सर्वांनी अभय मिळवून दिलं आहे. वास्तविक पाहता एक महिन्याच्या आत चौकशी पूर्ण होणे बंधनकारक असून शासन परिपत्रकानुसार असे न झाल्यास संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई आणि फौजदारी गुन्हा दाखल करणे गरजेचे असताना अशा प्रकारची कारवाई न झाल्यामुळे आता आमरण उपोषणाशिवाय पर्याय नाही. करोडो रुपयाच्या भ्रष्टाचारातील काही प्रमुख मुद्दे.: -
* मौजे होटगी येथील जिल्हा परिषद शाळांचे सुरक्षा भिंत न बांधता,  भिंत कागदावरच बांधून पंधरावा वित्त मधून परस्पर बनावट बिल काढण्यात आले आहे.
* वासवदत्ता सिमेंट कंपनीकडून आलेल्या व्यवसाय करा मध्ये कोणत्याही प्रकारचा कायदेशीर व्यवहार न करता करोडचा भ्रष्टाचार करण्यात आल्याचं पुराव्याशी सिद्ध झालं आहे.
* शासनाने ई ग्राम स्वराज या प्रणालीद्वारे ग्रामपंचायतीमध्ये होणारे ग्रामनिधी जमाखर्चाची अर्धवट माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
* ग्रामपंचायत मध्ये होणाऱ्या आर्थिक व्यवहारात स्थगिती देण्याबाबत
होटगी ग्रामपंचायत मधील सत्ताधारी पॅनल मधील भ्रष्ट अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराबद्दल विचारणा केले असता सर्व अधिकारी  आणि पोलीस आमच्या खिशात असून आम्हाला आमदारांचा आशीर्वाद आहे .त्यामुळे आमचे कुणी काहीच बिघडवू शकत नाही.
अशी मग्रुरी भ्रष्ट लोकांकडून होत असल्याचं गंगाराम चौगुले यांनी सांगितले आहे.
एक महिन्याच्या आत गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी पूर्ण न केल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी अन्यथा येत्या 20 ऑक्टोबर पासून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा गंगाराम चौगुले यांनी दिला आहे.
याप्रसंगी शशिकांत चौगुले,  पंडित गंगदे,  योगीराज चिवडशेट्टी,  अशोक निंबाळकर आदी उपस्थित होते.
.png)
 
 
 
 
.jpg) 
 
 
 
 
 
 
 
0 Comments