उजनी डाव्या कालव्यावरील वीस वर्षांपासून बंद वितरिका चालू होणार; आमदार रणजितसिंह मोहिते पाटील
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी माढा तालुक्यातील कोंढारभाग परिसरातील सिंचनासाठी प्रामुख्याने आवश्यक असणाऱ्या उजनी डाव्या कालव्यावरील बंद अवस्थेत असलेली वितरिका क्रमांक- ५ नूतनीकरण व दुरुस्ती करून कार्यान्वित करण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. उजनी डाव्या कालव्यावरील वितरिका कार्यान्वित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे यांना तात्काळ अंदाजपत्रकीय अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आल्याने उजनी डाव्या कालव्यावरील वितरिका चालू होणार असल्याचे रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले. बंद वितरिका चालू होणार असल्याने परिसरातील शेतकरी आनंदीत झाले आहेत.
उजनी डाव्या कालव्यावरील वितरिका क्रमांक- ५ ही गेल्या वीस वर्षांपासून बंद असल्याने आलेगाव बुद्रुक, रुई, आलेगाव खुर्द, गारअकोले (ता. माढा) या गावांमध्ये प्रत्येक वर्षी भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. भीमा नदीकाठी असणाऱ्या या परिसरामधील भीमा नदीचे पात्र उथळ असल्याने नदीपात्रात भीमा नदीला सोडलेले पाणी १५ दिवसांमध्ये तळ गाठते. त्यामुळे कोंढारभाग परिसरातील पिके पाण्याअभावी जळून जात असल्याने कोट्यवधी रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान होते. गेल्या अनेक वर्षांपासून या वितरिका चालू करण्याची मागणी शेतकरी करीत होते. ही बाब लक्षात घेऊन आमदार रणजिसिंह मोहिते पाटील यांनी केलेल्या केलेल्या मागणीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. उजनी डावा कालवा कामासाठी माजी महाराष्ट्र राज्य लेबर फेडरेशन भारत पाटील, हरिभाऊ माने यांनी ही मागणी जोर लावून धरली होती.
उजनी डाव्या कालव्यावरील वितरिका क्रमांक- ५ कार्यान्वित केल्याने ७०० हेक्टर क्षेत्र कायमस्वरूपी सिंचनाखाली येणार असून अप्रत्यक्षरीत्या ३०० हेक्टर क्षेत्रालाही फायदा होणार आहे.
"जिल्ह्यातील सिंचनाच्या दृष्टीने आवश्यक असणारे महत्त्वपूर्ण प्रकल्प, बंद पडलेल्या योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्नशील असून लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सिंचनाचे प्रश्न मार्गी लागणार आहेत." - आमदार रणजितसिंह मोहिते पाटील
"उजनी डावा कालवा वितरिका चालू करण्यासंदर्भात आम्ही गेल्या दहा वर्षापासून प्रयत्न करत होतो. आता प्रश्न मार्गी लागणार असण्याने आनंद झाला.
- हरिभाऊ माने
0 Comments