दादा भुसे, तानाजी सावंतांचा राजीनामा घ्या;
सुरवसे पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
ड्रग्ज माफिया ललित पाटील पलायन प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक
पुणे (कटूसत्य वृत्त):- ससून सर्वोपचार रुग्णालयात उपचार घेत असलेला ड्रग्ज माफिया ललित पाटील पलायन प्रकरणावरून काँग्रेस राज्य सरकार विरोधात आक्रमक झाली आहे. पोलिसांच्या तावडीतून एखादा कुख्यात आरोपी सहज पळून जाणे पुणे पोलिसांसाठी लाजिरवाणी बाब आहे. या गंभीर आणि संशयास्पद प्रकरणात आरोपी ललित पाटील याच्यावर उपचार करणाऱ्या ससून रुग्णालयातील सहा डॉक्टरांची, पोलिसांची, ससून अधिष्ठाता आणि संबंधित स्टाफ ची CBI अथवा CID मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यासंदर्भात बोलताना सुरवसे-पाटील म्हणाले, ललित पाटील याला ससूनमध्ये उपचारासाठी दाखल करून घ्या असा फोन दादा भुसेंनी अधिष्ठात्यास केल्याचे समोर आले आहे. ससून सारख्या मोठ्या रुग्णालयात कुख्यात आरोपीवर नऊ महिने नेमके कसले उपचार केले जात होते? उपचाराच्या नावाखाली रुग्णालयातून ललित पाटील याचा पाहुणचार होत होता आणि ससूनमधूनच कोट्यावधी रुपयांच्या ड्रग्जची तस्करी सुरु होती. या तस्करीतील पैसा सरकारमधील मंत्री, ससून प्रशासन आणि पोलिसांना देखील जात असल्याचा संशय सुरवसे-पाटील यांनी व्यक्त केला.
पुढे बोलताना सुरवसे-पाटील म्हणाले, आरोपीस पोलीस आणि रुग्णालय प्रशासनातील काही जणांचे निश्चितपणे सहकार्य होत असणार. आरोपीस पळून जाण्यामध्ये देखील ह्याच लोकांनी मदत केली असून शिंदे-फडणवीस सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांचा आरोपीवर आशीर्वाद आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून ससूनमधील डॉक्टर, पोलीस प्रशासनातील अधिकारी आणि मंत्री दादा भुसे यांचे सीडीआर तपासले जावेत. त्यातून अधिकची माहिती तपास यंत्रणाच्या हाती लागू शकते. या गंभीर प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत दादा भुसेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतलाच पाहिजे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गलथान कारभाराने राज्याची अब्रू गेली आहे. राज्यातील सर्वच विभागात गोंधळ सुरु आहे. आरोग्य यंत्रणेची पुरती वाट लागली असून शासकीय रुग्णालयांच्या बदनामी आडून खाजगीकरण करण्याचा या सरकारचा डाव असू शकतो. अकार्यक्षम आरोग्यमंत्री तानाजी सावंत व ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणाशी संबंधित असणारे मंत्री दादा भुसे यांचा तात्काळ राजीनामा घेतला गेला नाही तर सरकारविरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.
रोहन सुरवसे-पाटील
सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस
0 Comments